खेळाची मैदाने, व्यायामाची ठिकाणी, जॉगिंग पार्क आणि गार्डन नागरिकांसाठी खुली कराः क्रीडा-भारती

क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांना निवेदन

औरंगाबाद ,२७मे /प्रतिनिधी :- कोरोनाच्या साथीमुळे खेळाची मैदाने, व्यायामाची ठिकाणे, जॉगिंग पार्क आणि गार्डन बंद करण्यात आलेली आहे. मात्र, त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे आणि खेळाडूंना सराव करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे लवकरात लवकर ही सर्व ठिकाणे सुरु करावीत, या आशयाचे निवेदन विभागीय क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे यांना  क्रीडा -भारती या संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता. २७) देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या आजारात लसीकरण, विलगीकरण, मास्क, सॅनिटायझर आणि उपचारांसह प्रतिकारशक्ती आणि सकारात्मक मानसिकतेची आवश्यकता असते. खेळाची मैदाने, व्यायामाची ठिकाणे, जॉगिंग पार्क आणि गार्डमध्ये शारिरीक अंतर ठेवून केलेल्या हालचालींमुळे कोरोना संसर्गाचा धोका उद्भवत नाही. याउलट पुरेसा व्यायाम आणि खेळामुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती व सकारात्मक मानसिकता विकसित होण्यास मदत होईल. त्याशिवाय आगामी काळात स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यात सहभागी होऊन यश संपादन करण्याकरिता खेळाडूंना सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सराव नसेल तर ते अपेक्षीत यश मिळवू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची कित्येक वर्षांची मेहनत वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज हजारो खेळाडू घरामध्ये बंद आहेत. त्यांना सरावाची नितांत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन ही सर्व ठिकाणे सर्वसामान्य नागरिक आणि खेळाडूंसाठी सुरु करावी, अशी मागणी क्रीडा-भारती तर्फे करण्यात आली.

यावेळी क्रीडा-भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते संकर्षण जोशी आणि कोषाध्यक्ष विजय राठी यांची प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थिती होती.