राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीला ब्रेक,गेल्या 10 दिवसांत 415462 कोरोनामुक्त

मुंबई, 26 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातले होते. या कोरोना विषाणूची लाट आता ओसरत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासूनच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे आता राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याचं दिसत आहे.

राज्यात आज तर 24,752 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.आज 453 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे.राज्यात आज 23065 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 52,41,833 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 92.76 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 24,752 नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात सध्या 315042 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 10 दिवसांत राज्यात एकूण 415462 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आज 453 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 323 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 130 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.62 टक्के इतका झाला आहे.

आज गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, धुळे जिल्हा, लातूर शहर, परभणी शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, मीरा भायंदर शहर, कल्याण डोंबिवली शहर, ठाणे शहर, औरंगाबाद शहर, जळगाव शहर, धुळे शहर या ठिकाणी कोरोनामुळं एकाही मृत्यूची नोंद नाही. तर नवी मुंबई, वसई विरार, मालेगाव, अमरावती शहर परिसरात आणि औरंगाबाद, पालघर, चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तिचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारी आकडेवारीतून समोर आली आहे. 

आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान?

ठाणे – 3871

नाशिक – 3634

पुणे – 6004

कोल्हापूर – 4694

औरंगाबाद – 1095

लातूर – 1269

अकोला – 2619

नागपूर – 1566

एकूण – 24752