अक्का फाउंडेशनच्या पुढाकाराने जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण वेगाने होईल- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


निलंगा,२६ मे /प्रतिनिधी :- माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या प्रेरणेतून कार्य करीत असलेल्या अक्का फाउंडेशनने यापूर्वीही संकटकाळात केलेले काम अतिशय मोलाचे ठरलेले आहे. सेवा ही संघटन या संकल्पनेनुसार अक्का फाउंडेशन काम करीत असून सध्याच्या कोरोना संकटाकाळात नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. याकरिताच अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून अक्का फाउंडेशन लसीकरण टास्क फोर्स गठीत झालेला असून या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण अधिक वेगाने होवून जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण सुलभरीत्या व्हावे, याकरिता अक्का फाउंडेशनच्या वतीने टास्क फोर्स गठीत करण्यात आलेले आहे. 747 सदस्य असलेल्या या फोर्सचा आज वेबिनारच्या माध्यमातून सेवा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. या मेळाव्यात माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर, खा.सुधाकर शृंगारे, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकारी सहभागी झाले होते.

May be an image of 19 people, beard and text that says '#DevendraFadnavis Fadnavis'

गेल्या दीड वर्षांपासून भारत कोरोनाचा सामना करीत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात शहरी भागात दिसून आला होता. आता कोरोनाची दुसरी लाट आलेली असून, या लाटेचा प्रादूर्भाव शहरी भागातून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात झालेला होता. या लाटेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होवून तरुण व मध्यमवर्गीय कोरोनाचे बळी ठरलेले आहेत. विशेषत: या लाटेत रेमडीसिवर,ऑक्सिजन, बेड वेळेवर उपलब्ध न झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळाले. आता कोरोनाच्या दुसर्या लाटेचा संसर्ग कमी होत असला तरी तिसर्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

May be an image of 3 people, people standing and text

आगामी तिसरी लाट लक्षात घेता आणि कोरोनाचे विदारक चित्र पाहता याला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय उपलब्ध असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी देशातील नागरिकांचे अधिक वेगाने लसीकरण होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. मात्र सध्या लसीची कमतरता जाणवत असून, लवकरच लसीचे उत्पादन अधिक वेगाने होवून जून महिन्यापासून लसींचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, असे सांगितले. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे कोरोना लसीचे उत्पादन भारतात व्हावे याला प्राधान्य देण्यात आले होते. जेणेकरून भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाला लसीसाठी इतर देशांवर अवलंबून राहता येणार नाही, हाच यामागचा मुख्य हेतू होता. देशात लसीकरण मोहीम केंद्र सरकारच्या धोरणानुसार सुरू झाली होती. मात्र राज्य सरकारच्या आग्रहामुळे 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. मात्र ती आता लसीच्या कमतरतेमुळे स्थगित करण्यात आली आहे. आता आगामी महिन्यापासून लस सहज उपलब्ध शक्य असल्याने नागरिकांचे लसीकरण अधिक वेगाने व नियोजनबद्ध व्हावे, याकरिता सर्वांनीच प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

या प्रयत्नांना लातूर जिल्ह्यात अक्का फाउंडेशनची जोड मिळाली असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वीही संकटकाळात अक्का फाउंडेशनने केलेले कार्य कौतुकास्पद ठरले आहे. विशेषत: पाणीटंचाईच्या काळात जलसंधारणासाठी उपक्रम राबवला होता तो लातूर जिल्ह्यासाठी लाभदायी ठरलेला असून, त्याची दखल केंद्र सरकारनेही घेतली होती. आता कोरोनाच्या संकटाकाळात नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता अक्का फाउंडशनने जो टास्क फोर्स गठीत केला आहे, तो राज्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही गौरवोद्गार विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी काढले. 100 टक्के लसीकरण झाल्यास कोरोनासारख्या संकटाला आपण निश्चितच हद्दपार करू शकतो आणि याकरिता अक्का फाउंडेशन अधिक चांगले काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. यासोबतच अक्का फाउंडेशनच्या टास्क फोर्सने जे रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत, अशांचा सर्वेक्षण करून त्यांची म्युकरमायकोसिस, ब्लॅक फंक्स याचीही तपासणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

Displaying IMG-20210526-WA0063.jpg

मेळाव्याच्या प्रास्ताविकात फाउंडेशनचे प्रवर्तक अरविंद पाटील निलंगेकर यांनी अक्का फाउंडशनची स्थापना माजी खा. रूपाताई पाटील निलंगकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेली असून, याकरिता त्यांनी आपले निवृत्तीवेतनही फाउंडेशनला दिले असल्याची माहिती सांगितली. भारतीय संस्कृती ही सेवेची असून विशेषत: संकटाच्या काळात करण्यात आलेली सेवा अतिशय मोलाची ठरती.सध्याच्या कोरोना संकटकाळात अक्का फाउंडशनने सेवेचा संकल्प हाती घेतलेला असून नागरिकांच्या लसीकरणात अडचणी येत आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून टास्क फोर्स काम करणार असल्याचे स्पष्ट केले. या संकल्पनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होईपर्यंत टास्क फोर्स स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही देवून प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राष्ट्रीय सेवेचा संकल्प करण्यात येत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या संकटाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेतृत्वाची राज्याला कमतरता भासत असल्याची खंतही अरविंद पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केली. या टास्क फोर्समध्ये 747 सदस्य असून यांच्या माध्यमातून योग्य नियोजन झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांचे 75 दिवसांत लसीकरण पूर्ण करू, असा विश्वास अरविंद पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

या मेळाव्याचे सूत्रसंचलन भाजपच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश संयोजक तथा मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे यांनी केले. या वेबिनारला टास्क फोर्सच्या सदस्य व त्यांचे 110 सहकारी असे एकूण 857 यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला.