उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्मृतिदिनानिमित्त ‘पु.लं.’ना विनम्र अभिवादन

मुंबई, दि. १२ : ‘पु.लं.’नी महाराष्ट्र कायम हसता ठेवला, पुढेही ठेवत राहतील, असे ‘पु.लं.’ पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

‘पु.लं’ स्पर्श होताच, दुःखे पळाली… नवा सूर, आनंदयात्रा मिळाली… निराशेतून माणसे मुक्त झाली… जगू लागली, हास्यगंगेत न्हाली… असं ज्यांचं वर्णन कविवर्य मंगेश पाडगावकरांनी केलं ते आनंदयात्री पु.ल. देशपांडे अर्थात लाडक्या भाईंनी त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वानं महाराष्ट्र हसवला, हसता ठेवला अन् घडवला सुद्धा आहे. भाईंनी साहित्य व कलेच्या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी केली व रसिकांना मनमुराद आनंद दिला. माणुसकीचा आदर्श निर्माण केला. नैतिकता, दातृत्वाच्या बाबतीतही ते श्रेष्ठ ठरले. मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्रावर त्यांनी भरभरुन प्रेम केलं. महाराष्ट्राचा गौरव वाढविला, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *