अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

मुंबई,२४ मे /प्रतिनिधी:-गौण खनिजाचे अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतोय. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची आज बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तिन्ही जिल्ह्यांचे अधिकारी उपस्थित होते.

बांधकाम व्यावसायिकांची तपासणी करा !

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी किती गौण खनिज वापरले. किती बाहेर विकले. यासंदर्भात तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.

कोट्यवधींचा महसूल बुडतोय

गौण खनिजाच्या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतोय. महसूल यंत्रणेने योग्य वसुली केली तर राज्याच्या तिजोरीत काही प्रमाणात का होईना हातभार लागेल. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले.

रिक्त पदांना लवकरच मंजुरी

मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात महसूल विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. तसेच काही ठिकाणी पदेही मंजूर नाहीत. या ठिकाणी तत्काळ पदे मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिले. तसेच करमणूक कर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी महसूल विभागाकडे वर्ग करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवून कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.