इयत्ता बारावी परीक्षेचा निर्णय 1 जूनपर्यंत

संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बारावीची परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आयोजित करण्याबाबत राष्ट्रव्यापी चर्चा करण्यासंदर्भात बैठक

विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे शैक्षणिक कल्याण तसेच शिक्षण व्यवस्था सुरळीतपणे कार्यरत करण्यासाठी संपूर्ण देश एकत्र – रमेश पोखरीयाल ‘निशंक’

नवी दिल्ली,२३ मे /प्रतिनिधी :-

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे  शिक्षण मंत्री आणि प्रशासक यांच्यासमवेत आज राष्ट्रीय चर्चासत्र  आयोजित केले होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’, केंद्रीय महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी, केंद्रीय वन, पर्यावरण, हवामान बदल आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे, उच्च शिक्षण सचिव अमित खरे, शालेय शिक्षण सचिव श्रीमती अनिता करवाल तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या  बैठकीस उपस्थित होते.

चर्चेला आरंभ करताना, शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल, “निशंक” यांनी प्रथम आज  या प्राथमिक चर्चेला पाठिंबा दर्शविणाऱ्या आणि उपस्थित असलेल्या, केंद्रीय मंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या बैठकीत, असे नमूद करण्यात आले, की बारावी आणि विविध अभ्यासक्रमांच्या अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी 21 मे 2021 रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नऊ केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परीक्षांसंबंधी चर्चेसाठी आपला  वेळ आणि  मौलिक सूचना दिल्याबद्दल मंत्री महोदयांनी कृतज्ञता व्यक्त केली. या बैठकीस उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी केंद्रीय महिला, बाल विकास मंत्री, केंद्रीय माहिती आणि  प्रसारण मंत्री तसेच शिक्षण राज्यमंत्री यांचे आभार मानले. भारत सरकारची पहिली प्राथमिकता म्हणून मुलांची सुरक्षितता  व सुरक्षा याबाबत आपण   कटीबद्ध असल्याची भावना शिक्षणमंत्र्यांनी यावेळी  व्यक्त केली. शिक्षणमंत्री म्हणाले, की विद्यार्थ्यांची सुरक्षितता  आणि शैक्षणिक कल्याण तसेच शिक्षण व्यवस्थेचे कार्य  सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे. ते म्हणाले, की कोविड-19 चे आव्हान स्वीकारत यशस्वीरित्या ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यासाठी सरकारने कोणतीही कमतरता ठेवली  नाही. ते म्हणाले, की घरांचे रूपांतर शाळांमध्ये झाले.

विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे करियर सुनिश्चित करण्यासाठी असलेल्या बारावीच्या शैक्षणिक मंडळाच्या परीक्षांचे आणि विविध अभ्यासक्रमांच्या अखिल भारतीय प्रवेश परीक्षांचे  महत्व यावर  शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केली. शिक्षणमंत्री म्हणाले, की सध्याची परिस्थिती लक्षात घेता आम्ही दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा आणि अंतर्गत मूल्यांकनद्वारे त्यांचे मोजमाप करण्याचे ठरविले होते, परंतु विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवण्यासाठी दहावीच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

ते म्हणाले की, ही बैठक केंद्रीय आणि राज्य शैक्षणिक मंडळे तसेच इतर  विविध परीक्षा मंडळे या सर्वांना सद्य आव्हानात्मक परिस्थितीत उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांची चर्चाप्रक्रियेद्वारे तपासणी करता यावी यासाठी बोलावण्यात आली आहे. पोखरीयाल यांनी असे  आश्वासन दिले की, आजच्या बैठकीत  सर्व भागधारकांशी झालेल्या चर्चेने  मदत होईल आणि त्यायोगे सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षांवरील योग्य निर्णयापर्यंत पोहोचणे आणि आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करणे शक्य होईल.

या बैठकीत, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तसेच इतर राज्य मंडळांमार्फत बारावीसाठी घेण्यात येणाऱ्या बोर्ड परीक्षा तसेच विविध उच्च शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या अखिल भारतीय प्रवेश परीक्षा या दोन विषयांवर चर्चा झाली. परीक्षेची कार्यपद्धती, प्रक्रिया, कालावधी आणि वेळ यासंबंधीच्या  विविध पर्यायांवर यावेळी  चर्चा करण्यात आली. त्यात सर्वसमावेशक सहमती दर्शविली असतानाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या प्रकरणाची अधिक चाचपणी करून 25 मे 2021 पर्यंत लेखी प्रतिक्रिया देऊन त्सांनी आपला अभिप्राय पाठवावा, असा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला झारखंड आणि गोव्याचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि राज्य शिक्षण मंत्री, राज्य शिक्षण सचिव, परीक्षा मंडळाचे अध्यक्ष, उच्चशिक्षण विभागाचे सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक, केंद्रीय शालेय शिक्षण विभागातील वरीष्ठ अधिकारी, सीबीएसई, यूजीसी आणि एआयसीटीई, डीजीएनटीएचे अध्यक्ष आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.

समारोप  करताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, परीक्षा आयोजित करण्याच्या प्रस्तावांवर सकारात्मक सूचना दिल्याबद्दल सर्व सहभागींचे आभार मानले. त्यांनी मंगळवारी म्हणजेच 25 मे पर्यंत शिक्षण मंत्रालयाकडे इतर सूचना, प्रस्ताव असल्यास पाठवाव्यात अशी विनंती  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली. मंत्रालय या सर्व सूचनांचा  विचार करेल आणि लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. सर्व परीक्षा सुरक्षित वातावरणात आणि निर्धोकपणे घेणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचा त्यांनी पुनरुच्चार  केला.

यापूर्वी 14  एप्रिल रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याची आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात पुढील माहिती 1 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना दिली जाईल, अशी सूचना जाहीर केली होती. या संदर्भात, आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत  झालेल्या बैठकीनंतर भारत सरकार विविध राज्य सरकारांकडून या आठवड्यात येणाऱ्या प्रस्तावांचे परीक्षण करेल आणि 1 जून 2021 पर्यंत किंवा त्यापूर्वी विद्यार्थ्यांना या संदर्भात अधिक माहिती देईल, असे सांगण्यात आले.