राष्ट्रवादीची मोदींच्या इंडियन मॉडेलवर टीका

मोदी सरकारच्या सात वर्षात सर्वसामान्यांचे हाल झाले – नवाब मलिक

मुंबई ,२३ मे /प्रतिनिधी :-मोदींचे इंडियन मॉडेल झालेच पाहिजे परंतू नदीमध्ये मृतदेह प्रवाहीत करणे, ऑक्सिजन अभावी लोकं मरत आहेत, औषधांचा तुटवडा आहे, देशात लस उपलब्ध नसताना लस देण्याचा कार्यक्रम जाहीर करणे असे इंडियन मॉडेल कोणीही स्वीकारणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या इंडियन मॉडेलवर केली आहे.

मोदींचे जर हेच इंडियन मॉडेल असेल तर लोकांना यावर बोट ठेवण्याची संधी भाजप निर्माण करुन देत असल्याचेही ना. नवाब मलिक म्हणाले. एखादे यश मिळाले असेल किंवा चांगले काम केले असेल तर निश्चितरुपाने लोकं त्याची प्रशंसा करतात पण अपयशी ठरुनही आम्ही चांगले काम करतोय असे भाजप बोलत राहिले तर लोकं त्यांना स्वीकारणार नाहीत असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

या देशात भाजपचे सरकार हे मोदी सरकार म्हणून ओळखले जातं असून २६ मे रोजी भाजप सरकारला सात वर्ष पूर्ण होत आहेत. सध्याच्या कोरोना परिस्थितीत भाजपचे काही लोक हा उत्सव साजरा करणार होते म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना हा उत्सव साजरा करू नका असा आदेश काढावा लागला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपच्या या सात वर्षात नोटबंदी झाली, जीएसटी लावण्यात आला, कोरोनासारखी महामारी आल्यानंतर ती त्यांना यशस्वीपणे हाताळता आली नाही, सर्वसामान्यांचे हाल झाले, देशात बेरोजगारी वाढली, लोकं जीव गमावत आहेत तरीही भाजप सरकारची काही लोकं सात वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे.

गुजरातला १००० कोटी दिले तसेच नुकसान झालेल्या राज्यांना विशेषतः महाराष्ट्र आणि इतर राज्यांना आर्थिक मदत देण्याचे ट्विट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. परंतु ते काही तासांत डिलिट करण्यात आले. त्याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य काही तासांतच माघारी घेतल्याची बाब समोर आली. याचा अर्थ भाजपचा इतर पक्षावर दबाब तर होताच, परंतु आता भाजपाच्या नेत्यांवरही दबाव आणला जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

भाजपाच्या नेत्यांवर नजर ठेवली जात असल्याने ट्विट डिलिट होत आहे. नेते बोलल्यानंतर शब्द मागे घेत आहेत म्हणजे अंतर्गत बोलण्याचा अधिकार नेत्यांना नाही हे यातून सिद्ध झाले असल्याचे ना. नवाब मलिक सांगितले. जेव्हा पंतप्रधान मोदींनी हवाई सर्वे करण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रत्येक राज्याची पाहणी होईल असे वाटले होते, पण तसे झाले नाही. पंतप्रधानांनी फक्त गुजरात राज्याचीच पाहणी करून गुजरातला १००० कोटींची मदत जाहीर केली. इतर राज्याला दुर्लक्षित करणे चुकीचे आहे. देशातील बऱ्याचशा राज्याचे नुकसान झाले असताना देशाचे पंतप्रधान फक्त एकाच राज्याची पाहणी करून त्याच राज्याला मदत जाहीर करतात. हे योग्य नसून राज्य सरकार जे अहवाल पाठवत आहेत, ते पाहून महाराष्ट्रालाही तत्काळ मदत झाली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

कोरोना महामारीमुळे देशात लाखो संख्येने लोकांनी आपले जीव गमावले. या काळात अनेकांना औषधोपचार मिळत नाही. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. शासनाच्या विरोधात विशेषत: मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण होत आहे. अशातच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. परंतु ते खरंच भावूक झाले की हे चित्र निर्माण करण्यात आले, याबाबत आता लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी हे मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करताना नेहमीच उपरणे आणि मास्कचा वापर करत होते. मात्र त्यादिवशी त्यांनी उपरणे आणि मास्क दोन्ही वापरले नाही याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता, असा आरोपही नवाब मलिक यांनी मोदींवर केला आहे. दरम्यान पंतप्रधान खरंच भावूक झाले की ठरवून झाले याचे उत्तर आणि नेमकं खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.