मोफत मिळाले म्हणून काहीही वापरणार का ?-व्हेंटिलेटरवरून आ.सतीश चव्हाण यांचा संतप्त सवाल

औरंगाबाद ,२२मे /प्रतिनिधी :- 

परभणी येथील जिल्हा रूग्णालयासाठी पीएम केअर फंडातून देण्यात आलेली ज्योती सीएनसी कंपनीचे 15 व्हेंटिलेटरपैकी एकच हेंटिलेटर बायपॅप मोडवर वापरले जात आहे. तर बाकीचे 14 व्हेंटिलेटर तसेच एका खोलीत मांडून ठेवली असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी केलेल्या पाहणीवरून आज उघड झाले. मोफत मिळाले म्हणून काहीही वापरून रूग्णांच्या जीवाशी खेळणार का? असा संतप्त सवाल आ.सतीश चव्हाण यांनी केला आहे.

Displaying photo 1.jpg

     पीएम केअर फंडातून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास ज्योती सीएनसी कंपनीचे धमन III या मॉडेलचे प्राप्त झालेल्या 100 व्हेंटिलेटरपैकी 15 व्हेंटिलेटर परभणी जिल्हा रूग्णालयास वापरासाठी देण्यात आली होती. त्यापैकी सध्या किती व्हेंटिलेटर वापरात आहेत याची पाहणी करण्यासाठी आ.सतीश चव्हाण यांनी आज स्वत: प्रत्यक्ष परभणी जिल्हा रूग्णालयास भेट दिली. त्यावेळी वरील प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथील जिल्हा रूग्णालय यांना पीएम केअर फंडातून देण्यात आलेली ज्योती कंपनीचे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी पुराव्यानिशी उघड केले होते. आज परभणी येथील जिल्हा रूग्णालयास भेट दिल्यानंतर 15 व्हेंटिलेटरची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यातील फक्त एकच व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर वापरात असून बाकीचे 14 व्हेंटिलेटर तसेच एका खोलीत मांडून ठेवले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे हे व्हेंटिलेटर आहे की बायपॅप मशिन? याचा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली. ज्यावेळी तुम्हाला ही व्हेंटिलेटर प्राप्त झाली तेव्हा ती तपासून घेतली होती का?, न तपासताच तुम्ही ते कसे काय स्विकारले?, मोफत मिळाले म्हणून काहीही वापरणार का? असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केले.

हे व्हेंटिलेटर आयसीयू कक्षात वापरण्यायोग्य नसेल तर ते साभार परत करावेत अशा सूचना आ.सतीश चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर, ऍड.स्वराजसिंह परिहार, इंजि.नारायण चौधरी आदींची उपस्थिती होती.