चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मोठ्या पॅकेजची पंतप्रधानांकडे मागणी करणार-केंद्रीय मंत्री रामदास आठवले

गोवा,२२मे /प्रतिनिधी :-

तौते चक्रीवादळामुळे गोवा आणि महाराष्ट्रातील कोकण भागात शेतकऱ्यांचे विशेषत: आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली आहे. या सर्वांच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50,000 रुपये मदत करण्याची मागणी करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. राज्यातील चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते आज वास्को इथे आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.

गोव्यात चक्रीवादळामुळे सुमारे 140 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोव्यातील मच्छिमारांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. गोवा आणि महाराष्ट्रासह गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू राज्यांनाही चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे, त्यांनाही योग्य ती मदत करण्याविषयी पंतप्रधानांना लिहिणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

कोविड-19 परिस्थिती आणि कोविड लसीकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकार सर्व राज्यांना समान न्याय देत आहे. लसीकरणात दुजाभाव केला जात नाही. देशात रेमडेसिवीरची पुरेसी उपलब्धता आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील टाळेबंदीमुळे रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याचे आठवले यांनी सांगितले.केंद्रीय मंत्री रामदास आठवले चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसाच्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर होते.