पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनामुळे देशाने निसर्गऋषी गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ,२१ मे /प्रतिनिधी:- 

पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून  सुंदरलाल बहुगुणा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चिपको आंदोलनातून सुंदरलाल बहुगुणा यांनी केवळ झाडे वाचवली नाहीत तर पर्यावरण रक्षणाची चळवळ घराघरात नेली.  सामान्यातील सामान्य माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला. पर्यावरण रक्षणासाठी जीवन वेचणारे बहुगुणा हे जगभरातील पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणास्थान होते. निसर्गाबद्दल नितांत आदर, जिव्हाळा असणारा निसर्गऋषी आपण गमावला आहे. पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य पर्यावरण चळवळीसाठी दीपस्तंभासारखे – उपमुख्यमंत्री अजित पवार

सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य पर्यावरण चळवळीसाठी दीपस्तंभासारखे – उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, चिपको आंदोलनाचे प्रणेते, पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य जगभरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभासारखे आहे. सुंदरलालजींच्या निधनाने पर्यावरण रक्षणाच्या जागतिक चळवळीचे प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शक हरपले आहेत. सुंदरलालजींनी समाजातील सामान्य माणसाला निसर्गाचे महत्त्व पटवून दिलं. पर्यावरण रक्षणासाठी  लढण्यासाठी प्रेरित केले, ताकद दिली.

निसर्ग वाचविण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने, पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य, नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील. दिवंगत सुंदरलाल बहुगुणाजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून श्रद्धांजली वाहिली.

हिमालयपुत्र सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरण योद्धा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

हिमालयपुत्र सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरण योद्धा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध पर्यावरणवादी व चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

श्री सुंदरलाल बहुगुणा हे हिमालय पर्वतशृंखला तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धन कार्यास समर्पित असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्यसैनिक असलेल्या बहुगुणा यांनी जीवनात महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान अंगीकारत सत्याग्रहाचा अवलंब केला. त्यांनी व्यसनमुक्ती कार्यात पर्वतीय महिलांना संघटित केले. त्यांनी चिपको या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व केले तसेच प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी कार्य केले. श्री सुंदरलाल बहुगुणा यांचा आणि माझा घनिष्ठ परिचय होता हे माझे भाग्य समजतो. त्यांच्या निधनामुळे आपण पर्यावरण रक्षणासाठी समर्पित लढवय्या योद्धा गमावला आहे. हिमालयपुत्र दिवंगत श्री बहुगुणा यांच्या आत्म्यास प्रभूचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांना कळवतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.