अवैधरित्‍या वाळूची वाहतूक करणाऱ्याला अटक

औरंगाबाद ,२१ मे /प्रतिनिधी:- 

अवैधरित्‍या वाळूची वाहतूक करणाऱ्याला नाकाबंदी दरम्यान चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी दि.२१ सकाळी अटक केली. त्‍यांच्‍याकडून एक ब्रास वाळू आणि टेम्पो असा सुमारे सात लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे.

अवचितराव रावसाहेब बागल (४५, रा. गोरखनाथनगर, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव असून त्‍याला रविवारपर्यंत दि.२३ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी शुक्रवारी दि.२१ दिले.

चिकलठाणा पोलिस ठाण्‍याचे अंमलदार दिनकर पांढरे (३१) हे २० मे रोजी रात्री सहकाऱ्यांसह  झाल्टा फाटा येथे नाकाबंदीची कारवाई करीत  होते. त्‍यावेळी एक रेतीने भरलेला टेम्पो (क्रं. एमएच-२०-ईजी-२४२५) झाल्टा फाट्याहून येत होता. पोलिसांनी टेम्पो थांबवून चालक अवचितराव बागल याच्‍याकडे वाळुचा परवाना आणि वाहनाच्‍या कागदपत्रांची मागणी केली असता बागल याने कागदपत्र नसल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रकसह वाळू असा सुमारे सात लाख पाच हजारांचा ऐवज जप्‍त करुन चालक बागल विरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जरीना दुरार्णी यांनी टेम्पो मालक राजेंद्र कडुबा गाजरे (रा. चिकलठाणा) याला अटक करणे आहे. आरोपीने वाळू कोठून भरली व कोणाला विक्री करणार होता याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीने आणखी कोठे वाळूचा साठा केला आहे का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.