हिंगोली :एकच व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर म्हणून वापरात,आ.सतीश चव्हाण यांच्याकडून पोलखोल

औरंगाबाद ,२० मे / प्रतिनिधी :- पीएम केअर फंडातून हिंगोली जिल्हा रूग्णालयाला ज्योती सीएनसी कंपनीचे  15 व्हेंटिलेटर देण्यात आली होती. त्यातील सगळीच व्हेंटिलेटर वापरात असल्याचे पत्र हिंगोली जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आ.सतीश चव्हाण यांना दिले. मात्र आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.20) प्रत्यक्षात हिंगोली जिल्हा रूग्णालयास भेट देऊन सदरील व्हेंटिलेटरची पाहणी केली असता यातील एकच व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर वापरले जात असल्याचे सांगत आ.सतीश चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांची पोलखोल केली.

Displaying photo 2.jpg

     पीएम केअर फंडातून औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास ज्योती सीएनसी कंपनीचे धमन खखख या मॉडेलचे प्राप्त झालेल्या 100 व्हेंटिलेटरपैकी 15 व्हेंटिलेटर हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयास वापरासाठी देण्यात आली होती. त्यापैकी सध्या किती व्हेंटिलेटर वापरात आहेत?, किती बंद अवस्थेत आहेत?, असे प्रश्न उपस्थित करून याचे लेखी उत्तर मला त्वरित कळविण्यात यावे असे पत्र आ.सतीश चव्हाण यांनी 19 मे रोजी हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद येथील जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज आ.सतीश चव्हाण यांना सर्व 15 व्हेंटिलेटर वापरात आहेत. सद्यस्थितीत यापैकी कोणतेही व्हेंटिलेटर बंद अवस्थेत नाही. सद्यस्थितीत व्हेंटिलेटर बंद अवस्थेत नसल्यामुळे वरिष्ठ विभागास कळविण्यात आलेले नाही असे लेखी पत्राव्दारे सांगितले.

Displaying photo 3.jpg

     हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयास आ.सतीश चव्हाण यांनी भेट देऊन सदरील व्हेंटिलेटरची पाहणी केली. यातील फक्त एकच व्हेंटिलेटर वापरात असून तेही बायपॅप मोडवर वापरले जात आहे. त्यातूनही ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होत नसल्याने त्याला अन्य स्त्रोताने अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. तुम्ही आज दिलेल्या पत्राने माझे समाधान झाले नसून वस्तुनिष्ठ तपशील देण्याची मागणी आ.सतीश चव्हाण यांनी डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांच्याकडे केली. डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आ.सतीश चव्हाण यांना पुन्हा एक पत्र दिले. या पत्रात 15 पैकी 2 व्हेंटिलेटर सुरू होत नाहीत, उर्वरीत 13 व्हेंटिलेटरला पुरेशा दाबाने ऑक्सिजन पुरवठा देऊन कार्यान्वित केले असता त्यामध्येे एअर आणि ऑक्सिजन सप्लाय फेल्ड असा मॅसेज दिसून येत आहे, सर्व व्हेंटिलेटरर्सला बॅटरी बॅकअप पुरेसा नाही, यापैकी दोन व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर वारपले असता त्यास अन्य स्त्रोत्राने अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागत आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदरील व्हेंटिलेटर वापरण्यायोग्य नसल्याचे हे माहित असतांना सुध्दा ते वापरण्याचा अट्टाहास आरोग्य यंत्रणेकडून का केला जातोय असा प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला. हे व्हेंटिलेटर वापरासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेवर कुणाचा दबाव येत असेल तर राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषी अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांची देखील उपस्थिती होती.