रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री,घाटीतील परिचारिकेच्या पतीसह दोघांची रवानगी पोलिस कोठडीत  

औरंगाबाद,२० मे /प्रतिनिधी

कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारात २५ हजारात विक्री करणाऱ्या   दोघांना बुधवारी दि.१९ रात्री गुन्हे शाखेच्‍या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्‍यात आलेल्या एका आरोपीची पत्‍नी ही घाटीत परिचारिका म्हणुन काम करते, तिनेच  रेमडेसिवीर इंजेक्शन आरोपींना दिल्याचे तपासात समोर आले आहे.आरोपींकडून कार, रेमडेसिवीर इंजेक्शन, मोबाइल आणि रोख असा सुमारे आठ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.

नितीन अविनाश जाधव (२८, रा. कोहीनूर कॉलनी) असे परिचारिकेच्‍या पतीचे नाव आहे. तर गौतम देविदास अंगरक (३६, रा. गादीया विहार) असे साथीदाराचे नाव आहे. दोघा आरोपींना सोमवारपर्यंत दि.२४ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी गुरुवारी दि.२० दिले.

घाटीत आरती रामदास ढोले उर्फ आरती नितीन जाधव ही कोविड वॉर्डात  परिचारिका आहे. तिचा पती नितीन जाधव हा कार चालक आहे. आरती ही कोविड वॉर्डात आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन २५ हजारात काळ्याबाजारात साथीदार गौतम अंगरक याच्या मदतीने विकत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून बुधवारी विटस हॉटेल ते पीरबाजार या रस्त्यावर पकडले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अंगरक याने दहा जणांना इंजेक्शनची विक्री केल्याचे त्याच्या मोबाइलवरील संभाषणावरुन समोर आले आहे.

दोघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी आरोपींनी जप्‍त मुद्देमाल कोठून, कसा आणला आणि कोणाला विक्री केला याचा तपास करणे आहे. आरोपींची साथीदार तथा परिचारीका आरती हिने दिल्याची कबुली आरोपी नितीन जाधव याने दिली आहे. आरतीने नेमके कोठून व किती रेमडेसिवीर विक्रीसाठी बाहेर दिले याचा तपास बाकी असल्याने आरतीला अटक करणे आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती रेमडेसिवीरची विक्री केली याचा तपास आणि गुन्‍ह्यात आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.