घाटीतील मंजूर रिक्त पदे त्वरीत भरा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Displaying PHOTO 1.jpg

औरंगाबाद,१८मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी), सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, शासकीय कर्करोग रूग्णालयातील वर्ग-3 व वर्ग-4 ची मंजूर रिक्त पदे त्वरीत भरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले असल्याची माहिती आ.सतीश चव्हाण यांनी दिली.

         औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, कर्करोग रूग्णालयातील मंजूर पदे भरावीत अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत आज (दि.18) यासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यता आली होती. मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकट काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांपासून ते आरोग्य सेवा देणारे कर्मचारी अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. मात्र अपुर्‍या मनुष्यबळा अभावी आहे त्या आरोग्य कर्मचार्‍यांवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी), सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, शासकीय कर्करोग रूग्णालयातील मंजूर असलेली रिक्त पदे तातडीने भरावीत अशी आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन सदरील रूग्णालयांमधील वर्ग-3 व वर्ग-4 ची पदे त्वरीत भरण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दिले आहेत. वर्ग-1 ची पदे एमपीएससी मार्फत भरली जात असल्याने ही पदे देखील त्वरीत भरण्याच्या सूचना एमपीएससीला दिल्या जातील असे अजित पवार यांनी या बैठकीत सांगितले. तसेच सदरील रूग्णालयांसाठी जे मंजूर बजेट आहे ते तात्काळ वितरीत करण्याच्या सूचना देखील अजित पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

कोविडच्या परिस्थितीत घाटीवर सध्या प्रचंड ताण येत आहे यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी या बैठकीत केली. याची देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेत यासंदर्भात त्वरीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीस औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच वित्त व वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आ.सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. केंद्र सरकारने कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणार्‍या आरोग्य सेवकांना नियमित शासकीय भरतीमध्ये प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या सर्वच आरोग्य कर्मचार्‍यांना नियमित शासकीय भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी अमित देशमुख यांच्याकडे केली. अमित देशमुख यांनी देखील या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे आ.सतीश चव्हाण यांना सांगितले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभगाचे सचिव सौरभ विजय यांची देखील उपस्थिती होती.