तोक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

समुद्र किनाऱ्यावरील  रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड ,ठाणे आणि पालघर  जिल्ह्यातील  जिल्ह्यातील १३ हजार ३८९ नागरिकांचे स्थलांतरण

अलिबाग ,१८मे /प्रतिनिधी :-  तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर  जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते. या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला.तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड ,ठाणे आणि पालघर  जिल्ह्यातील  13 हजार 389 नागरिकांचे सुरक्षित स्थळी  स्थलांतरण करण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील 4563 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  190 ,रायगड जिल्ह्यातील  8383 ,ठाणे जिल्ह्यातील  53  आणि पालघर जिल्ह्यातील  200 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने  दिली आहे.

या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून मृत व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे आहे –

निता भालचंद्र नाईक, वय ५० वर्षे, त्या उरण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला.

सुनंदाबाई भिमनाथ घरत,वय ५५ वर्षे,ह्या उरण तालुक्यातील असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला.

रामा बाळू कातकरी, वय ८० वर्षे, ते  पेण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू आंब्याची फांदी अंगावर पडून झाला.

रमेश नारायण साबळे, वय ४६ वर्षे, धाकाव एमआयडीसी, रोहा (रा.डोंबिवली, ठाणे) येथील असून त्यांचा मृत्यू अंगावर झाड पडून झाला.

या चारही मृत व्यक्तींची नोंद घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील आवश्‍यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे.

नुकसानीचे संयुक्त पंचनामे तातडीने सुरू करण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे आदेश
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे तातडीने सुरू करण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे आदेश

तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व तहसिलदारांना दिले आहेत.

दि.17 मे 2021 रोजी जिल्हयात तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या घर, गोठे, शेती व सार्वजनिक मालमत्ता यांचे झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी.

तसेच मृत व्यक्ती, मृत जनावरे यांच्याबाबतही संयुक्त पंचनामे करण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास त्वरित सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व तहसिलदारांना दिले आहेत.