व्हेंटिलेटर नादुरुस्त:रुग्णांच्याबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद,१७ मे /प्रतिनिधी:-

 कोरोना रुग्णांची घटती संख्या ही समाधानाची बाब आहे, मात्र अजूनही आपली कोरोना विरुध्दची लढाई संपलेली नाही. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलिस, महानगरपालिका, डॉक्टर्स यांच्यातील एकजूट व समन्वयाने आपण कोरोनाला निश्चित हरवू, यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज पालकमंत्री यांनी औरंगाबाद शहर व जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नादुरुस्त  व्हेंटिलेटर, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण मोहीम, खाजगी रुग्णालय आकारत असलेले वाढीव दराचे बिलं, ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती, तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, यांचा सविस्तर आढावा यावेळी पालकमंत्री यांनी घेतला.

बैठकीस रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई शेळके, खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाठ, अंबादास दानवे, सतीष चव्हाण, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त्‍ डॉ.निखील गुप्ता, महापालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॅा.कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.निता पाडळकर यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची बाब धक्कादायक आहे. याची निश्चितीच  दखल घेतली जाईल. रुग्णांच्याबाबत  निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणाबाबत कठोरात कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान राज्य शासनाकडून रुग्णांसाठी यापूर्वी चांगले व्हेंटीलेंटर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यापुढेही चांगल्या दर्जाचे व्हेटिलेटर्स उपलब्ध करुन दिले जातील. शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत आहे. मृत्यूसंख्याही वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत 25  किंवा 25 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब कोविड केअर सेंटर सुरु करावे. ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी, त्यासाठी त्यांना मदत करावी. लसीकरण सुरळीत होण्यासाठी लसींचा पुरवठा कसा वाढेल, याकडे लक्ष दिले जाईल, असेही ते म्हणाले. खाजगी रुग्णालये राज्य शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारत असतील तर ॲडिटरमार्फत त्याची कडक पध्दतीने तपासणी करावी व रुग्णांची लूटमार होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

कोविड मॅनेजमेंट सर्टीफिकेट कोर्सबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, या कोर्सबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालयाकडून गेला आहे.  आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून त्यासाठी मान्यता मिळण्याकरिता निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्याकरीता प्रशासनाने आवश्यक ती उपाययोजना व खबरदारी घेण्यासाठी बारकाईने नियोजन करावे,  यासाठी सर्वतोपरी साहय केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस विभागाच्या वाहनांविषयी बोलताना ते म्हणाले की, आजच पोलीस विभागाला बारा चारचाकी आणि 74 मोटारसायकली देत आहोत. तसेच  18 चारचाकी आणि 160 मोटारसायकली मिळण्यासाठी तरतूद केली जात आहे.

महसूल राज्यमंत्री म्हणाले की, चौदाव्या वित्त आयोगाच्या   शिल्लक रक्कमेतून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका देण्याचा निर्णय झाला आहे. आठ दिवसांत त्यावर कारवाई केली जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लग्न, साखरपुडा, अंत्यविधी करीता होणाऱ्या गर्दीवर गांभीर्याने लक्ष दयावे लागेल. तर ग्रामीण भागात चाचण्यांवर अधिक भर देण्याची सूचना त्यांनी केली.

खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हयातील कोरोना रुग्णांच्या घटत्या संख्येबद्दल डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले. यावेळी नादुरुस्त व्हेंटिलेटर प्रकरणी संबंधित पुरवठा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली, तसेच लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्याबरोबरच शासकीय दंत महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद शहरात इतर जिल्हयातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने जिल्हयासाठी अतिरिक्त निधी मिळावा, घाटीतील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली. आमदार सतीश चव्हाण यांनी नादुरुस्त व्हेंटीलेटर परत करावेत. ग्रामीण भागात मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रबोधन करावे, अशी मागणी केली. आ.अंबादास दानवे यांनी मुंबईच्या धर्तीवर जिल्हयात लसीकरण करावे. कोविड मॅनेजमेंट सर्टीफिकेट कोर्सला मान्यता द्यावी. म्युकरमायकोसिसबाबत नियमावली व उपचारपध्दती ठरवावी, अशी मागणी केली. आमदार बोरनारे यांनी नादुरुस्त व्हेंटीलेटर कोरोना रुग्णांसाठी वापरू नयेत.  तसेच वैजापूर तालुक्यात लसींचा पुरेसा साठा व रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. आ. राजपूत यांनी कन्नड तालुक्यातील आरोग्य केंद्रात ऑक्सिजनचा साठा तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हयातील कोरोनाची स्थिती व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व लोकप्रतिनिधीं, डॉक्टर्स, अधिकारी  व कर्मचारी यांच्या समन्वयाने व एकजुटीने जिल्हयातील कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. ब्रेक द चेनच्या माध्यमातून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात तपासणी व कॉन्टॅकट टे़सिंगवर भर दिला जात आहे. पुरेशा प्रमाणात बेड व ऑक्सिजन उपलब्ध आहे. महानगरपालिकेकडूनही कोरोना रुग्णांबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. एमएचएमएच ॲप व नियंत्रण कक्षातून रुग्णांना आवश्यक ती माहिती मिळण्यास मदत होत आहे.  ग्रामीण भागातही प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याठी आतापासूनच नियोजन  करण्यात आले आहे. या लाटेचा बालकांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.