सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे स्थलांतरण

 ‘तौक्ते’ वादळाचा फटका, 3 तास मुंबई विमानतळ राहणार बंद

रायगडच्या नागरिकांचं स्थलांतर
मुंबई-गोवा मार्गावर 12 झाडं कोसळली
स्थानिक प्रशासनानं पडलेली झाडं हटवली
महाड, रोह्यात विजेचे 17 पोल पडले
उरणमध्ये भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

मुंबई ,​​१७ मे /प्रतिनिधी:-

“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील  12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

रायगड जिल्ह्यात पहाटे तीन वाजल्यापासूनच जिल्ह्यात या वादळाचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर  एका भाजीविक्रेती महिला जखमी झाली आहे.
आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत 
रत्नागिरी  जिल्ह्यातील 3 हजार 896  ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील  8 हजार  380  लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे,  मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य  प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.

श्रीवर्धन, मुरुडचा वीजपुरवठा खंडित
रोहा, महाड, अलिबागचा वीजपुरवठा खंडित
महाड, पोलादपुरात वीजप्रवाह सुरळीत