तलवारीसह स्‍वत:चे फोटो काढून ते सोशल मिडीयावरव्‍हायरल करणाऱ्या तरुणाला अटक  

औरंगाबाद,१६मे /प्रतिनिधी

सोशल मिडीयावर तलवारीसह स्‍वत:चे फोटो काढून ते व्‍हायरल करणाऱ्या तरुणाला गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने रविवारी दि.१६ सकाळी अटक केली. आदित्‍य रमेश गायकवाड (२०, रा. म्हाडा कॉलनी, हर्सुल परिसर) असे आरोपीचे नाव असून त्‍याच्‍या ताब्यातून एक तलवार व मोबाइल असा सुमारे १९ हजारांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे.

आरोपी आ‍दित्‍य गायकवाड याला मंगळवारपर्यंत दि.१८ पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. दहातोंडे यांनी रविवारी दि.१६ दिले.

प्रकरणात गुन्‍हे शाखेचे आंमलदार आनंद राधाकृष्‍ण वाहुळ (३५) यांनी फिर्याद दिली.१५ मे रोजी रात्री गुन्‍हे शाखेचे सहायक निरीक्षक शिंदे यांच्‍या पथकाला माहिती मिळाली की, आदित्‍य गायकवाड याच्‍याकडे तलवार असून त्‍याने तलवारीसह त्‍याचे फोटो व्‍हाट्स अॅप तसेच सोशल नेटवर्कींग साईटवर व्‍हायरल केले आहेत. तलवारी सोबतच्‍या फोटो आधारे तो परिसरात दहशत पसरवित आहे. या माहितीवरुन गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने आरोपीच्‍या घरी छापा मारुन आरोपीला अटक केली. तसेच त्‍याच्‍या घरातून पोलिसांनी तलवार आणि मोबाइल जप्‍त केला. या प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.   

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आला असता, सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी आरोपीने तलवार कोठून व कोणाकडून आणली याचा तपास करणे आहे. तलवार बाळगण्‍याचा नेमका उद्देश काय आणि आरोपीने काढलेल्या फोटोत त्‍याचे साथीदार देखील असल्याने त्‍यांचा शोध घेवून त्‍यांना देखील अटक करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.