राजीव सातव यांना श्रद्धांजली :तरुण नेतृत्व गमावले 

प्रमोद माने 

राठवाडयाने आधीच दोन हिरे आधीच हिरावले आहेत ,माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उप मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे या सुपुत्रांना गमविल्यानंतर आता हे नुकसान मराठवाडा सहन करू शकणार नाही !त्याआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे मराठवाडा पोरका झाला होता. दिल्लीत गेल्यावर या सर्व नेत्यांची महती किती होती हे जाणवायचे.


मराठवाड्याचे सुपुत्र खासदार राजीव सातव कोरोनाशी लढा यशस्वी परंतु साइटोमेगालो वायरस या नवीन विषाणुचा संसर्ग ने दुःखद निधन झाले.महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राने आज एक तरुण नेतृत्व गमावले.आकस्मित जाण्यामुळे पक्षात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष,युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा त्यांचा प्रवास होता. काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेला उमदा नेता गमावला आहे.एक युवा नेता काळाने आपल्यातून हिरावून नेला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केले. काँग्रेसचे भविष्यातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला. सुसंस्कृत ,साधेपणा, नम्रता, जपलेली सादगी हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्ये होते . त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी न भरून निघणारी आहे.

सातव यांचे निधन ही काँग्रेसची मोठी हानी आहे.महिन्यांतून किमान एकदा तरी राजीव सातव यांच्याशी फोनवर बोलणे व्हायचे . राहुल गांधी यांच्या जवळचा विश्वासु म्हणून त्यांची ओळख .फोनवर बोलण्यात कधीच राजकारणावर सुरुवात होत नसत. मी हे पुस्तक वाचले आहे ,आपण वाचलेत का ?नाही असे उत्तर दिल्यावर हे पुस्तक वाचा आणि मला प्रतिक्रिया कळवा. नंतरच्या गप्पागोष्टीत ते पुस्तक वाचलेले असेल तर ठीक ,नाहीतर राजीव पुढचे बोलणे टाळायचा. असे एक दोनदा झाले. मग मी ठरविले सातव यांनी सांगितले पुस्तक वाचून प्रतिक्रिया कळवायची. राजीवमुळे मला अनेक पुस्तक वाचायला मिळाली. पुस्तक वाचले म्हटल्यावर हा गडी खुश व्हायचा,सिनेमा ,समाजकारण या विषयाचे ज्ञान राजीवचे खूप होते.

गांधी यांच्यावर इतकी टीका केली जाते त्यावर आपली प्रतिक्रिया काय ?असे मी विचारल्यावर सातव काहीच बोलायचे नाहीत. काँग्रेसवर मी खूप टीका करायचो तरीही हा गडी शांतच ,काँग्रेसला आपण कितीही शिव्या घातल्या तरीही सातव आपला मुद्दा शांतपणे सांगत असत.शेवटी मी राहुल गांधी आणि काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असे सातव म्हणायचे. एव्हढी श्रद्धा सातव यांची काँग्रेसवर होती. सातव कधी कुणावर चिडलेले मी कधीच पाहिले नाही.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी किस्साच वेगळा आहे. हा किस्सा त्यांनीच मला सांगितला होता,काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी मुलाखत घेत होत्या. राजीव सातव समोर बसले होते. मुलाखतीत राजीव सातव यांना सोनिया यांनी प्रश्न विचारला “तुमचा आवडता नेता कोण?” राजीव सातव नी उत्तर दिले “शरद पवार”. मुलाखत झाली, राजीव सातवांना वाटले हे उत्तर दिल्यामुळे कदाचित आपली निवड होणार नाही. तिकडे सोनिया गांधींनी राजीव सातव यांच्यातला प्रामाणिकपणा ओळखला होता. पुढच्या काही दिवसातच राजीव सातव हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले व तिथून सुरू झालेला झंझावात आता संपला आहे.