कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, ,१५ मे /प्रतिनिधी :-  कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या २ जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले.

आरोग्य विद्यापीठाच्या विविध शाखांच्या परीक्षा वेळापत्रकांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऑनलाईन बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव  सौरभ विजय, विद्यापीठाचे  प्रभारी-कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाचे विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक बैठकीस उपस्थित होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 2 जून 2021 पासून विविध विद्याशाखांच्या हिवाळी-2020 पदवी परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील कोविड विषयक सद्यपरिस्थिती पाहता तसेच राज्यातील कडक निर्बंधामुळे परीक्षेच्या नियोजन संदर्भामध्ये तसेच वेळापत्रकासंदर्भात सर्व संबंधितानी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा, असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले.

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-2021 परीक्षा 24 जून 2021 पासून नियोजित होत्या. सदर परीक्षा याआधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक जाहिर होणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितानी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा, असे निर्देश, ही  वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनी दिले.