नागपुरात कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या ड्राईव्ह इन लसीकरणाला प्रारंभ

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उ‌द्‌घाटन

नागपुर, 14 मे 2021

नागपूर महानगरपालिके तर्फे कोविड प्रतिबंधात्मक लसीच्य ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचे आज स्थानिक सीताबर्डी येथे ग्लोकल मॉलमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग तसेच केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त बी.राधाकृष्णन उपस्थित होते. या ड्राईव्ह इन लसीकरणात मॉलच्या पार्किंग एरियामध्ये गाडीतून येणाऱ्या 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत करण्यात येत आहे. याप्रसंगी गडकरी यांनी जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सदर लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. 

या उद्घाटनानंतर गडकरी यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना वर्धाच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस मध्ये 17 हजार रेमडेसिविर इंजेक्शनच्या पहिल्या खेपेचे वितरण हे विदर्भात होणार आहे. आज सुद्धा 25 हजार इंजेक्शनची खेप निघणार आहे. यांचे वितरण महाराष्ट्र ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी सुद्धा होणार असून इंजेक्शनच्या उपलब्धतेमुळे या इंजेक्शनच्या काळाबाजाराला आळा बसणार असल्याचे सांगितले. 

कोविड मधून जे लोक बरे झाले आहेत त्यातील काहींना ‘ब्लॅक फंगस ‘चा संसर्ग होऊन डोळ्यांना अपाय होण्याची शक्यता असते त्यामुळे असे लक्षणे दिसताच त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन गडकरी यांनी केले. कोरोनाच्या  संभाव्य तिसऱ्या लाटेचा बालकांना संसर्ग होऊ नये यासाठी नागपूरातील डागा इस्पितळात एक स्पेशल वार्ड तयार करण्यास सुद्धा महानगरपालिका सज्ज  असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

नागपुरात ज्येष्ठांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ‘सेवा सुरु झाल्याचे समाधान : डॉ.नितीन राऊत

मुंबई पाठोपाठ नागपूर येथे डॉ.नितीन राऊत यांचे सूचनेनुसार नागपूर महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ला सुरुवात केल्याचा मनस्वी आनंद असल्याचे मत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

May be an image of 4 people, people standing and indoor

बेडची उपलब्धता, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा करणारा नागपूर जिल्हा या उपक्रमातही अग्रेसर असून महानगरपालिकेने पुढाकार घेऊन ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिम सुरू केल्याबद्दल डॉ.नितीन राऊत यांनी मनपाचे कौतुक केले.

आज नागपूर शहरातील बैद्यनाथ चौक येथील ट्रीलीयन मॉलमध्ये त्यांनी साठ वर्षांवरील जेष्ठांच्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिमेची सुरुवात केली. यावेळी त्यांनी वाहनात आलेल्या श्यामदास छाबराणी (८३ वर्ष ), कृष्णा छाबराणी (६२ वर्ष ) या ज्येष्ठांचे लसीकरण केल्यानंतर गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. छाबराणी परिवाराशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागपूर महानगरपालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी, आमदार अभिजित वंजारी, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी,स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर,मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धंतोली विभागाच्या सभापती वंदना भगत, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहाय्यक आयुक्त किरण बगडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी व आरोग्य अधिकारी संजय चिलकर यांच्या नेतृत्वातील आरोग्य पथक उपस्थित होते.

आज सकाळी ग्लोकल स्क्वेअर मॉल या ठिकाणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन ‘चे उद्घाटन झाले. त्यानंतर दिवसभरात हा अशा पद्धतीच्या लसीकरणाचा दुसरा कार्यक्रम आहे.नागपूर शहरातील ज्या नागरिकांना स्वतः एकटे येणे शक्य नाही, जे ज्येष्ठ नागरिक अंथरूणाला खिळून आहेत. किंवा अन्य आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशा 60 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या नातेवाईकांनी किंवा ओळखीच्या व्यक्तीने स्वतःच्या वाहनांमध्ये याठिकाणी आणल्यास वाहनात बसून असतानाच त्यांचे महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून लसीकरण केले जाते.या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय ऑटोमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांना आणले जाऊ शकते. जे जेष्ठ नागरिक स्वतःचे वाहन, दुचाकी चालवू शकतात, त्यांना देखील या ठिकाणी सुविधा दिली जाणार आहे, तथापि ही सुविधा केवळ 60 वर्षावरील असाह्य ज्येष्ठ नागरिकांसाठी असून नागपुरातील तरुणाईने यासाठी आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना याठिकाणी पोहोचवून त्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी मदत करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांनी यावेळी काही नागरिकांचे लसीकरण होईपर्यंत वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असल्याचे स्पष्ट केले. सध्या नागपूर शहरांमध्ये बेड,ऑक्सिजन,रेमडेसिवीर इंजेक्शन व अन्य औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.जिल्ह्यामध्ये कोरोना विरुद्धची लढाई सर्व मिळून सर्वांच्या सहकार्याने लढली जात आहे. पुढील काळातील नियोजनासाठी प्रयत्न केले जात असून दर चार तासाने प्रत्येक बाबीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काळात ही लाट नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंधाचे पालन करावे. गरज नसेल तर घराबाहेर निघूच नये. लसीकरण पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडणे आपल्या सोबत इतरांना धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लसी उपलब्ध होणे आवश्यक असून शंभर टक्के लसीकरण हे सध्या एकमेव उद्दिष्ट आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, नागपूर शहरातील तरुणांनी या दोन केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आणण्यात मदत करावी, स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असेही आवाहन डॉ.राऊत यांनी केले.