रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांचा नियमित जामीन फेटाळला   

औरंगाबाद ,१४ मे /प्रतिनिधी :-

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या  पॅथॉलॉजी लॅब चालकासह परभणीतील एकाने सादर केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. कांबळे यांनी शुक्रवारी दि.१४ फेटाळला. आरोपी संदीप चवळी आणि गोपाल गांगवे अशी पॅथॉलॉजी लॅब चालकांची नावे असून त्‍यांना ४ मे तर परभणी येथील माधव शेळके याला ५ मे रोजी पोलिसांनी अटक केली होती.

या प्रकरणात पोलिसांनी संदिप चवळी व गोपाल गांगवे या दोघांना सापळा रचून अटक केली होती. त्यांच्याकडून सहा रेमडेसिवीर जप्त करण्यात आले. अन्‍न व औषध विभागाचे निरीक्षक जीवन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुंडलीकनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. चौकशीमध्ये आरोपी संदीप चवळी याने माधव शेळके याच्‍याकडून प्रत्‍येकी आठ हजार रुपये प्रमाणे सहा इंजेक्शन विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्‍या पथकाने माधव शेळके याला अटक केली.

आज तिघा आरोपींच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, त्‍यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले. त्‍यानंतर आरोपींनी नियमित जमीनीसाठी अर्ज सादर केला होता. या प्रकरणात सहायक सरकारी वकील नीता किर्तीकर यांनी काम पाहिले.