युपीएससीची पूर्व परीक्षाही ढकलली पुढे ; आता या तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली, १३ मे /प्रतिनिधी :-

नोवल कोरोना विषाणू  (कोविड -19 ) मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय  लोकसेवा आयोगाने 27 जून,2021 रोजी नियोजित केलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलली आहे . आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.

एकीकडे देशात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसून अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा लावले आहेत. अशामध्ये अनेक परीक्षांच्या तारखा बदलल्यानंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. २७ जून २०२१ रोजी होणारी परीक्षा आता १० ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे.दरवर्षी पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीन टप्प्यात आयोगातर्फे नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवासाठी (आयपीएस) अधिकारी निवडले जातात. 

पूर्व परीक्षेमध्ये दोन पेपर वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. या परीक्षेतील गुण अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट होणार नाहीत. यूपीएससी  मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी असणे आवश्यक आहे.
 
 
 
महाराष्ट्रातही वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ एप्रिलला होणारी राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तसेच अभियांत्रिकीची प्रवेशपूर्व परीक्षा असलेली जीईई-मेन्स कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. जीईई-मेन्स ही २४ मे ते २८ मे दरम्यान होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जीईई-मेन्स पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यालयीन आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) काढले.