रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार:आरोपीच्या कोठडीत वाढ 

औरंगाबाद,१३ मे /प्रतिनिधी :-

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या  दोघा पॅथॉलॉजी लॅब चालकासह परभणीतील एकाच्‍या पोलिस  कोठडीत शनिवारपर्यंत दि.१५ वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी गुरुवारी दि.१३ दिले. संदीप चवळी आणि गोपाल गांगवे अशी पॅथॉलॉजी लॅब चालकांची नावे असून त्‍यांना ४ मे तर माधव शेळके असे परभणी येथील आरोपीचे नाव असून त्‍याला ५ मे रोजी पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणात पोलिसांनी संदीप  चवळी व गोपाल गांगवे या दोघांना सापळा रचून अटक केली होती. त्यांच्याकडून सहा रेमडेसिवीर जप्त करण्यात आले. अन्‍न व औषध विभागाचे निरीक्षक जीवन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुंडलीकनगर पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. चौकशीमध्ये आरोपी संदीप चवळी याने माधव शेळके याच्‍याकडून प्रत्‍येकी आठ हजार रुपये प्रमाणे सहा इंजेक्शन विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्‍या पथकाने माधव शेळके याला अटक केली.

पोलिस कोठडी दरम्यान शेळके याने सदरील इंजेक्शन हे परभणी येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्णालयातून कोणाला काही कळू न देता उचलून आणल्याची कबुली दिली. याबाबत पोलिसांनी रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. प्रकाश डाके यांची चौकशी केली असता, त्‍यांनी रुग्णालयातून इंजेक्शन गहाळ किंवा चोरीला गेले नसल्याने आमच्‍याकडे कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.

 तिघा आरोपींच्‍या कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी आरोपी शेळके याने सात रेमडेसिवीर इंजेक्शन कोठून आणली याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींच्‍या पोलिस  कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.