परभणीत इंधन दरवाढीचा भडका,पेट्रोलच्या दराने शंभरी पार

परभणी,१२ मे /प्रतिनिधी :- : 

राज्यच नव्हे तर कदाचीत देशातील सर्वाधिक महाग इंधन परभणी जिल्ह्यातील वाहनधारकांना खरेदी करावे लागत आहे. यामुळेच पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील रेकॉर्डब्रेक पेट्रोलची किंमत चर्चेत आली आहे. परभणीत आज, बुधवारी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. पेट्रोलचा दर प्रती लिटर 100 रुपये 70 पैसे झाला आहे. पावर पेट्रोल तर तब्बल 104.11 पैसे प्रति लिटर दराने विक्री होत आहे. याप्रमाणेच डिझेलची किंमत देखील वाढली असून, ते 90.67 पैसे लिटर  प्रमाणे विक्री होत असल्याने परभणीकर संताप व्यक्त करत आहेत.

     मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत आहे. 8 मेपर्यंत शंभरीच्या आत असलेले पेट्रोलचे दर 9 मेला 100 रुपये 1पैसे झाले. त्यानंतर 10 मे ला 100 रुपये 26 पैसे तर 11 रोजी 100 रुपये 51 पैसे आणि आज, बुधवारी 12 मे रोजी यात 24 पैश्यांची भर पडली. त्यानुसार आजचा दर 100 रुपये 70 पैसे प्रति लिटर एवढा झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात इंधनाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. मात्र, याबाबत परभणीकरांच्या तीव्र भावना व्यक्त होताना दिसत आहे. इंधनाच्या भावाढीचा अन्याय केवळ आमच्यावरच का,  असा सवाल वाहनधारक विचारात आहेत. सध्या ‘लॉकडाऊन’ आहे. त्यात अनेकांचा आधीच रोजगार गेला. आणि आता इंधन दरवाढीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.  

विशेष म्हणजे पेट्रोल प्रमाणेच डिझेलच्या भावात (90.67 पैसे) देखील वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक महागली आहे. भाजीपाला, धान्य यांची दरवाढ सुरू झाली आहे. भाज्या महागल्या. धान्याचे दरही वाढले. बहुतांश ऑटोरिक्षा पेट्रोल व डिझेलवर चालतात. त्यामुळे प्रवाशी वाहतुकीची दरवाढ सुरू झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतुक, दळणवळण, व्यापारी आणि प्रवास यावर वितरीत परिणाम झाला आहे. ही इंधन दरवाढ रोजच होत असल्याने याचा परिणाम इतर वाहतुकीवर होत आहेत. हे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात इंधनाचे दर सर्वाधिक असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्ह्याच्या जवळपास कुठलाही डेपो नाही. त्यामुळे जिह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपाना 330 किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून इंधन पुरवठा होतो. तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपाना सुमारे 300 किमी दूर असलेल्या सोलापूर येथून पुरवठा केला जातो. या ठिकाणाहून इंधन येण्यासाठी वाहतूकवर मोठा खर्च होतो. ज्यामुळे पेट्रोल व डिझेल च्या किंमती वाढतात. त्यामुळे परभणीत अन्यथा जवळ असलेल्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारल्यास वाहतुकीवर होणारा हा खर्च कमी होतील.