पीएम केअर फंडमधून राज्याला मिळालेली व्हेंटिलेटर्स दर्जाहीन– डॉ. नरेंद्र काळे

भाजपा आमदारांनी व्हेंटिलेटर्सच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करावा

मुंबई ,१२ मे /प्रतिनिधी  :- देशात कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्सची मागणी वाढत असल्याने केंद्र सरकारने पीएम केअर फंडच्या माध्यमातून राज्यांना व्हेंटिलेटर्स देऊ केले आहेत. अती गंभीर रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. मात्र केंद्राकडून मिळालेले हे व्हेंटिलेटर्स बाजारात उपलब्ध असणाऱ्या व्हेंटिलेटर्सच्या तुलनेत फारच निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या व्हेंटिलेटर्सचा दर्जा सुधारावा, अशी मागणी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केली आहे.

देशातील अनेक राज्यात व्हेंटिलेटर्सचा हा सावळागोंधळ असल्याने रुग्णांना वेळेत व्हेंटिलेटर मिळणे कठीण झाले आहे. या मशीनमध्ये बिघाड झाल्यास याची दुरुस्ती होणे कठीण आहे. यासाठी संबंधित कंपनीने नियोजन करणे गरजेचे असते, मात्र त्या यंत्रणेची सज्जता नाही. या नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे डॉ. काळे यांनी निदर्शनास आणले.

व्हेंटिलेटर्सचा सर्व घोळ लवकरात लवकर सुधारण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.तसेच राज्यातील भाजप नेत्यांनी कोरोनाकाळात आर्थिक सहाय्य म्हणून सीएम केअर फंडऐवजी पीएम केअर फंडला मदतनिधी दिला होता. मग या निधीचा वापर योग्य प्रकारे व्हायला हवा, ही भाजपा नेत्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यातील भाजपा नेत्यांनी या व्हेंटिलेटर्सचा दर्जा, दुरुस्ती व चौकशीसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नरेंद्र काळे यांनी केली आहे.