उमरग्यातील आर.डी.शेंडगे हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरची चौकशी करुन गुन्हे दाखल करा -शिवसेनेचे शाहूराज माने यांची मागणी 

No photo description available.

उमरगा,१२ मे /नारायण गोस्वामी
येथील बहुचर्चित आर . डी शेंडगे हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरची, सीआयडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी करून गैरव्यवहार करणाऱ्या  दोषींवर  गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसेनेचे शाहूराज माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे . 

तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना दिलेल्या निवेदनात श्री.माने यांनी आहे. गतवर्षी कोरोना काळात व त्यापूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान योजना मध्ये ,आर.डी.शेंडगे हॉस्पिटल ॲंड रिसर्च सेंटरने बनावट लाभार्थी दाखवून  गैरव्यवहार केल्याचे शासकीय  चौकशीत निष्पन्न झाले आहे . या  प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी संबंधित शेंडगे हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा व संबंधितावर गुन्हे दाखल करावेत  असा प्रस्ताव डिसेंबर २०२० मध्ये शासनाकडे व आरोग्य विभागाकडे (मुंबई) पाठविला आहे . हा प्रस्ताव पाठवून जवळपास पाच महिने झाले तरी अद्याप आर.डी. शेंडगे हॉस्पिटल वर कायदेशीर कार्यवाही झालेली नाही. 

निवेदनात पुढे म्हटले आहे कि ,कार्यवाही तर अजून झालीच नाही ,उलट कोरोनाच्या या दुसऱ्या महाभयंकर लाटेत डॉ.शेंडगे यांच्या हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर  उपचारासाठी कोणतीही शासकीय परवानगी नसताना ,या रुग्णालयात कोविड रुग्णांवर अवैधरीत्या  उपचार करण्यात येत आहेत . यात चार कोरोना रुग्णांचा  मृत्यू याच हॉस्पिटल मध्ये झाल्याची चर्चा आहे.इतके गंभीर प्रकरण असताना, शासन,प्रशासन व लोकप्रतिनिधी या हॉस्पिटल मधील गैरप्रकार पाठीशी घालत आहेत . यामुळे शासनाच्या विविध आरोग्य योजना ,ज्या गोरगरीब रुग्णाच्या उपचारासाठी राबविल्या जातात . त्यात गैरव्यवहार करून,लाखो  रुपयांचा अपहार करणारे  डॉक्टर व त्याला साथ देणारे आरोग्य विभागातील कर्मचारी व यात सहभागी सहकारी यांची सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करून  हॉस्पिटलचा परवाना त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . 

जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव?

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  आर डी शेंडगे हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरला कोविड हॉस्पिटलची मान्यता मिळावी याकरिता उमरगा येथील ,विविध राजकीय  पक्षाच्या ‘काही’ नेत्यांनी ,जिल्हाधिकारी कार्यालयचा  उंबरठा झिजवल्याची माहिती उपलब्ध होत आहे . जिल्हाधिकारी यांनी, ह्या बदनाम हॉस्पिटलला ‘ खाजगी कोविड हॉस्पिटल’म्हणून मान्यता द्यावी ह्याकरिता राजकीय दबावतंत्र  सुद्धा सुरू असल्याची माहिती सुत्राकडुन  उपलब्ध होत आहे . खरे तर डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरील देव . पण  वैद्यकीय क्षेत्रातील काही महाभाग पैशाच्या लोभामुळे आपले प्रामाणिक कर्तव्य विसरून जेव्हा अडलेल्या,नडलेल्या गरीब  गंभीर रुग्णांची आर्थिक लुट करीत असतील तर अशा डॉक्टरच्या मागे आपली राजकीय ताकद  लावण्यामागे  ‘काही’ राजकीय नेत्यांचा ‘ हेतू’ न समजण्या इतकी जनता मुळीच भोळी नाही.