निलंगा तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाचा कहर

वीज पडून दोन जण ठार , सात जनावरे दगावली
Displaying IMG-20210510-WA0069.jpg

निलंगा,१० मे /प्रतिनिधी :- 

निलंगा तालुक्यात  रविवारी दि. 9 मे रोजी सायंकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये  विज पडून औरादशहाजानी येथे एका तरूणाचा व तगरखेडा येथे एका शेळ्या  राखणाऱ्या  व्यक्तीचा  मृत्यू झाला तर वीज पडून तालुक्यात विविध ठिकाणी सात जनावरे दगावली. अनेक ठिकाणी भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले आहे. 
गेल्या पंधरा ते विस दिवसापासून तालुक्यात वारंवार अवकाळी पाऊस सुरू असून यामुळे शेतकरीही वैतागले आहेत. मागील दोन दिवसापूर्वी विजा पडून शेतकऱ्यांचे गाय, म्हैस व बैल दगावले होते. तर पुन्हा रविवारी  तालुक्यातील तगरखेडा येथे शेळ्या राखणारे गोरोबा रामा सुर्यवंशी वय 65 हे पावसात शेळ्या घेऊन झाडाखाली  थांबले असता विज पडुन सायंकाळी 5:15 वाजता मरण पावले.औरादशहाजनी येथील शर्मा नगर भागात  सुभाष किसनराव देशमुख,वय 33 वर्षे हे  घराच्या गच्चीवरील कपडे व साहित्य काढताना अंगावर वीज पडून मरण पावले.

वीज पडून येळणूर येथील रमेश भिमराव सोळंके यांची गाय व म्हैस ,  हंचनाळ येथील शेतकरी चंद्रकांत बिरादार यांच्या गट क्रमांक 62 मध्ये त्यांचे दोन बैल ,  हलगरा गट क्रमांक 54 येथील शेतकरी सुरेश संभाजी गंगथडे यांच्या  शेतामध्ये त्यांची एक गाय ,  ताडमूगळी येथे शेषेराव पाटील यांच्या शेतात त्यांची गाय , मदनसुरी येथे सर्वे 198 मध्ये रेखा संजय चाटले यांच्या शेतातील गाय दगावली आहेत.  वीज पडल्याने तालुक्यात सात जनावरे दगावली आहेत. तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पाऊस मेघगर्जनेसह पडला आसून विज पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यात भाजीपाला, फळपिके यासह विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या पॉलिहाऊसचे  मोठे नुकसान झाले आहे