औरंगाबाद,अमरावती येथील एफसीआयची विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती

May be an image of 1 person

नवी दिल्ली,१० मे /प्रतिनिधी:  औरंगाबाद आणि अमरावती येथील भारतीय खाद्य महामंडळाची (एफसीआय)  दोन विभागीय कार्यालये तात्काळ प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात येत आहेत, अशी माहिती  केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली .

Food Corporation of India in need of restructuring as corruption mars  operations

रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, ” औरंगाबाद आणि अमरावती येथील महाराष्ट्रातील एफसीआयची आणखी दोन कार्यालये, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात कामकाज सुलभ करण्यासाठी तातडीने कार्यान्वित होणार आहे. यातून, मराठवाडा व पश्चिम विदर्भातील शेतकरी, पीडीएस लाभार्थी, स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था आणि ग्राहकांना मोठा फायदा होईल. ही कार्यालये कार्यान्वित झाल्यामुळे आम्ही या भागातील लोकांसाठी अधिक कार्यक्षमतेने काम करू शकू.”

    “राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियमांतर्गत देशातील जनतेची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याची भारतीय खाद्य महामंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तसेच, शेतकर्‍यांकडून शेतीमाल खरेदी करण्या संबंधित देखील, एफसीआय या देशातील शेतकर्‍यांसाठी सर्वात विश्वासार्ह संस्था म्हणून अनेक दशकांपासून काम करते आहे. एफसीआय देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध कार्यालयांच्या माध्यमातून कार्य करीत असून, कोविडच्या काळात एफसीआय ने आपली जवाबदारी अत्यंत कार्यक्षमते ने पार पडली आहे. व या देशातील लोकांसाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल मला संस्थेचा आणि सर्व अधिकाऱ्यांचा अभिमान आहे,” असेही त्यांनी नमूद केले. 

    महाराष्ट्रात भारतीय खाद्य निगम सहा विभागीय कार्यालयांमार्फत कार्यरत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या संरचनेत बोरीवली विभागीय कार्यालय मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे येथील धान्य पुरवठ्याचे नियोजन करते, तसेच विभागीय कार्यालय पनवेल रायगड येथील, विभागीय कार्यालय पुणे दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उर्वरित कोकण विभाग येथील, विभागीय कार्यालय नागपूर संपूर्ण विदर्भ येथील आणि विभागीय कार्यालय मनमाड नाशिक, खान्देश व मराठवाड्यातील सर्व प्रमुख जिल्ह्यांच्या अन्नपुरवठ्याचे नियोजन करते. सध्याच्या संरचनेत प्रत्येक विभागीय कार्यालयाला विस्तृत भौगोलिक कार्यक्षेत्र आहे.नवीन विभागीय कार्यालये त्वरित प्रभावाने कार्यान्वित होतील. साठवण क्षमता व्यवस्थापन, सार्वजनिक वितरण प्रणालीचे नियोजन आणि खाद्यान्न खरेदी सुधारित संरचने नुसार विभागीय कार्यालयामार्फत केली जाईल. भारतीय खाद्य निगम सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांच्या गरजा यशस्वी रित्या पूर्ण करीत आहे. विशेषतः सध्याच्या साथीच्या परिस्थितीत भारत सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहे. नवीन विभागीय कार्यालये स्थापन झाल्याने, चालू असलेल्या प्रयत्नांना अधिक प्रभावी करण्यात नक्कीच मदत होईल:

    “केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या “सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास” या दिशेने काम करत आहोत,असे सांगून त्यांनी श्री गोयल यांचेही आभार व्यक्त केले आहेत.