गृह अलगीकरणातील रुग्णांची विशेष काळजी घ्यावी– केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

·        पैठण तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

·        सर्व प्रशासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय साधावा

Displaying _DSC3585.JPG


औरंगाबाद,८ मे /प्रतिनिधी :-  ग्रामीण भागातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गृह अलगीकरणातील रुग्णांची विशेष देखभाल, काळजी व योग्य उपचार करण्यात यावे, ज्यामुळे या रुग्णांपासून इतर लोक बाधित होणार नाही. परिसरातील रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजन खाटा, ऑक्सिजन प्लँट तसेच इतर आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे संबंधित यंत्रणांना दिले.

पैठण येथील तहसील कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पैठण तालुक्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे (आयपीएस), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, गट विकास अधिकारी के.एस.बागुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण आगाज, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

May be an image of one or more people

राज्यमंत्री श्री.दानवे म्हणाले, गृह अलगीकरणातील रुग्णांकडेही अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता असून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात वेळोवेळी सुसंवाद झाला पाहिजे. गृह अलगीकरणातील रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड केअर सेंटर परिपूर्ण उपचार सुविधांसह उपलब्ध असावेत. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांत ऑक्सिजन सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी उपचार सुविधा सज्ज ठेवण्याची सूचनाही श्री.दानवे यांनी संबंधितांना यावेळी दिली.

यावेळी श्री.दानवे यांनी तालुक्यातील आडुळ, बालानगर, ढाकेफळ, नांदर, निजलगाव, पिंपळवाडी (पी) विहामांडवा येथील प्राथमिक आरोगय केंद्र निहाय गृह अलगीकरणातील रुग्ण, कोरोना आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल रुग्ण, बरे झालेले रुग्ण, आरटीपीसीआर व अँटिजन चाचण्या, कंटेन्टमेंट झोन या बाबत आढावा घेतला. आरोग्य सुविधांसाठी नेमलेले नोडल अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्रशासकीय यंत्रणांनी रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी तसेच तत्पर सेवेसाठी परस्पर समन्वय राखावा. तसेच 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याचीही सूचना श्री.दानवे यांनी यावेळी संबंधितांना केली.

बैठकीच्या वेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कोरोना आढावाबाबत माहिती दिली.