अवैधरित्‍या गुटख्‍याची वाहतूक करणाऱ्या  दोघांना  अटक

६३ हजारांच्‍या गुटख्‍यासह कार जप्‍त   

औरंगाबाद,८ मे /प्रतिनिधी

कारमध्‍ये अवैधरित्‍या गुटख्‍याची वाहतूक करणाऱ्या  दोघांना जिन्‍सी पोलिसांनी शनिवारी दि.८ पहाटे अटक केली. त्‍यांच्‍याकडून ६३ हजारांच्‍या गुटख्‍यासह कार असा सुमारे एक लाख ६३ हजारांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे. ही कारवाई रोशन  गेटकडून आझाद चौकाकडे जाणाऱ्या  रस्‍त्‍यावर  करण्‍यात आली.

मोहम्मद असलम मोहम्मद मोअजम (३५, रा. गुलाबशाह कॉलनी, खुलताबाद) आणि शेख मोइनोद्दिन शेख अहेमोद्दीन (२६, रा. शुलीभंजन ता. खुलताबाद) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे असून त्‍यांना रविवारपर्यंत दि.८ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी दिले.

या प्रकरणात अन्न व औषध विभागाचे अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर (४५) यांनी फिर्याद दिली.  शनिवारी दि.८ पहाटे जिन्‍सी पोलिस  ठाण्‍याचे उपनिरीक्षक एस.जे. शेख यांना माहिती मिळाली की, एका कारमध्‍ये (क्रं. एमएच-०२-एपी-२७१२) अवैधरित्‍या गुटख्‍याची वाहतूक करण्‍यात येत आहे. त्‍यानूसार, शेख व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी  सापळा रचून रोशन  गेटहून आझाद चौकाकडे जाणाऱ्या  कारला पकडले. काराची तपसाणी केली असता त्‍यात ६३ हजारांचा गुटखा सापडला. पोलिसांनी कार चालक मोहम्मद असलम आणि त्‍याचा साथीदार शेख मोहनोद्दिन या दोघांना अटक केली. या प्रकरणात जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

दोघा आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपींनी गुटखा कोठून आणला व कोणाला विक्री करणार होते याचा तपासा करणे आहे. आरोपींना गुन्‍ह्यात कोणी मदत केली का याचा तपास करणे आहे तसेच आरोपींनी यापूर्वी देखील अशा प्रकारे गुन्‍हा केला आहे का ?याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.