महापारेषणच्या जालना विभाग कार्यालयाचे उद्घाटन

जालना,८ मे /प्रतिनिधी  :

महापारेषणच्या औरंगाबाद विभाग कार्यालयाचे विभाजन करून जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यालय सुरू करण्यात आले आहे.आतापर्यंत महापारेषण कंपनीचे औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठीचे संयुक्त विभाग कार्यालय औरंगाबाद येथे होते.

महापारेषणचा वाढता विस्तार लक्षात घेऊन जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यालय मंजूर झाले होते. एमआयडीसी परिसरातील 220 केव्ही जालना उपकेंद्राच्या आवारात नुकतेच हे कार्यालय सुरू झाले आहे. महापारेषणच्या औरंगाबाद (अतिउच्च दाब, संचालन व सुव्यवस्था) मंडलाचे अधीक्षक अभियंता आर. पी. चव्हाण यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी जालना (अउदा, संवसु) विभागाच्या कार्यकारी अभियंता मनीषा भंगाळे, औरंगाबाद (अउदा, स्थापत्य) विभागाचे कार्यकारी अभियंता जे. पी. पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यालयांतर्गत 220 केव्हीचे 4 व 132 केव्हीचे 10 उपकेंद्र येतात तसेच अंदाजे 1000 सर्किट किलोमीटर लाईन येते. स्थापत्य विभागाने ह्या कार्यालयासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च केला आहे, असे महापारेषणने कळवले आहे.