कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांसाठी महावितरणचा विलगीकरण कक्ष

औरंगाबाद ,८ मे /प्रतिनिधी  : महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांसाठी १० बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांच्या हस्ते या कक्षाचे शनिवारी सकाळी उद्घाटन करण्यात आले.   

कोरोनाची लागण झालेल्या मात्र सौम्य लक्षणे असलेल्या व राहत्या घरी विलगीकरणाची सोय नसलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी हर्सूल येथील प्रशिक्षण केंद्रात हा कक्ष सुरू केला आहे. यावेळी प्रभारी मुख्य अभियंता बिभीषण निर्मळ, प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता एकनाथ वाघ, सतीश खाकसे, निधी गौतम, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्सलवार, विनय घनबहादूर, अनिल कराळे,उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने, सहायक अभियंता श्याम मोरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शहर मंडल कार्यालयाच्या अधिपत्याखाली हा कक्ष सुरू राहील. या ठिकाणी विलगीकरणात ठेवलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जेवण व चहानाश्त्याची सुविधाही देण्यात येणार आहे. कामाच्या व्यापात महावितरणचे कर्मचारी कोरोना बाधित झाल्यास त्यांना या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात येईल. त्यासाठी १० बेडचा सर्व सोयींनी सुसज्ज असा कक्ष उभारला आहे. याबरोबरच महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी हडकोतील एम्स हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्डची सोय केली जाणार आहे. महावितरणच्या विलगीकरण कक्षात दाखल कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन तपासणीसाठी या हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी सेवा देणार आहेत.