कोविड नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे वावरणाऱ्या नागरिकांना औरंगाबाद खंडपीठाच्या  कानपिचक्या     

भूमिपूजन आणि वाढदिवस साजरा करणे यातच लोकप्रतिनिधी गर्व मानत आहेत-औरंगाबाद खंडपीठ
आमदार प्रशांत बंब यांनी औरंगाबाद खंडपीठात मागितली माफी  
कुणाचीही मुलाहिजा न ठेवता मास्क व्यवस्थित न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा ,औरंगाबाद खंडपीठाचे आदेश   
दुचाकीसाठी हेल्मेट सक्तीचे 
मास्क घालताना  तोंड आणि  नाक झाकले गेले पाहिजे 
ग्रामीण भागात  अँटिजन चाचणी वाढविण्याचे आदेश 

औरंगाबाद,७ मे /प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात  घराबाहेर पडताना प्रत्येकाने नाक व तोंड पूर्ण झाकले जाणारे मास्क घातलेच पाहिजेत.
मास्कचा केवळ शाेभेपुरता वापर करून फिरणाऱ्या व्यक्ती काेराेनाच्या सुपरस्प्रेडर ठरू शकतात. मास्क व्यवस्थित न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रविंद्र घुगे आणि न्या.बी.यू.देबडवार यांनी पुन्हा  पोलिस प्रशासनाला दिले आहेत. 

रेमडेसिविर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार, ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे होणारे हाल, बेड उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ अशा मथळ्याच्या  प्रकाशित झालेल्या इंडियन एक्सप्रेस,दिव्य मराठी ,लोकमत ,सकाळ या   विविध वृत्तपत्रातील बातम्यांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रविंद्र घुगे आणि न्या.बी.यू.देबडवार यांनी  जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे.

गेले वर्षभरापासून जनता कोरोनाचा मुकाबला करीत आहे. गतवर्षी निर्माण झालेल्या परिस्थितीचीही दखल यापुर्वी खंडपीठाने घेतलेली होती. त्यासंदर्भात वेळोवेळी निर्देशही दिले. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरली त्यानंतर अचानक दुसरी लाट आली आणि या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविरचा तुटवडा, ऑक्सीजनचा तुटवडा, बेड उपलब्ध नसल्याच्या नवीन समस्या पुढे आल्या. या संदर्भात गेले काही दिवसांपासून वृत्तपत्रातून सातत्याने बातम्या प्रकाशित होत असल्याचे लक्षात घेऊन खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी आज सुमोटो  याचिका दाखल करुन घेतली आणि अ‍ॅड्. सत्यजित बोरा यांची  अ‍ॅमिकस क्युरी म्हणून नेमणूक करण्यात आली.त्यांनी याचिका तयार करून खंडपीठात सादर केली. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना त्याचे सरकारवर खापर फोडण्याआधी नागरिकांनी स्वत: संयम अाणि शिस्त पाळली पाहिजे, अशी टिप्पणी करुन औरंगाबाद खंडपीठाने कोविड नियमांचे पालन न करता बेशिस्तपणे वावरणाऱ्या नागरिकांना कानपिचक्या दिल्या आहेत.
शिवसेनेचे आमदार संजय  शिरसाट आणि शहराचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे माहिती खंडपीठात सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे यांनी दिली. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम, एकत्र येण्यास-गर्दी जमवण्यास निर्बंध असताना ते डावलून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंतराचे नियम तोडून गर्दी जमली हाेती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात घोडेले व त्यांच्या २५ ते ३० समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.  काेराेना राज्यात थैमान घालत असताना राज्य सरकारचे निर्बंध धाब्यावर बसवून गर्दी जमवून शिवसेनेचे आमदार  संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी वाळूज परिसरात सार्वजनिक कामाचे उद‌्घाटन केले हाेते. याप्रकरणी त्यांच्यासह ४० जणांवर २६ एिप्रल रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कलम २६९, २७०, १८८, १३५ नुसार हा गुन्हा नोंद झाला . 
लोकप्रतिनिधी, हे आदर्श नेते आणि रोल मॉडेलअसायला हवे पण हेच नेते  कोरोना निर्बंध झुगारून भूमिपूजन आणि वाढदिवस साजरा करणे यातच लोकप्रतिनिधी गर्व मानत आहेत याचे आश्चर्य वाटते असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. 
स्मशानभूमीत विद्युत किंवा गॅस दाहिनी बसवण्याचा पर्याय प्रशासनाने तपासून पाहावा. यासाठी कृती आराखडा तयार करा. या दाहिनी मे अखेरपर्यंत उभारल्या जातील असे सरकारतर्फे सांगण्यात आले. त्यासाठी स्वयंसेवी संस्था ,उद्दोगपती ,सढळ हाताने मदत करणारे दाते,लोकप्रतिनिधी यांनी पुढे येऊन विद्द्युत दाहिन्या निर्माण केल्या पाहिजेत अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली. तसेच यासाठी जिल्हा नियोजनातील निधी,लोकप्रतिनिधी यांचा स्थानिक निधींचाही  वापर करता येईल अशी सूचना न्यायालयाने केली .