रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या कराव्यात- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,७ मे /प्रतिनिधी :-

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या  कमी होत आहे, मात्र भविष्यातील कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी ज्या गावांत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे त्या गावात जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

करमाड येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन रुग्णालयाची त्यानंतर ऑक्सीजन प्लान्ट उभा करण्याच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसिलदार ज्योती पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक अपर्णा रंजनकर, विक्रम ठाकरे, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ यांची उपस्थिती होती.

Displaying IMG_20210507_135242.jpg

यावेळी श्री. चव्हाण यांनी लसीकरण, कोरोना चाचण्या, ऑक्सीजन, रुग्णालयात उपलब्ध असलेले मनुष्यबळ आदी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत येथील कोरोना रुग्णांशी संवाद साधून त्यांना कुठलीही अडचण नसल्याची खात्री करुन घेतली.

तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे कळताच येत्या दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण भागात होत असलेल्या लग्न समारंभात गर्दी होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच सकाळी अकरा नंतर इतर आवश्यक असणारी दुकाने ही खुली राहणार नाही याची काळजी घेत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.

Displaying IMG_20210507_135433.jpg

वैद्यकीय अधीक्षक अपर्णा रंजनकर यांनी आतापर्यंत 2 हजार 486 जणांची स्वॅब तपासणी झाली असून त्यातील 577 कोरोना पॉझिटिव्ह आले. तर आता पर्यंत या ग्रामीण रुग्णांलयात 59 कोरोना बाधीतावर उपचार करण्यात आले असून 29 रुग्णांवर उपचार सुरु असून 23 रुग्ण कोरोनामुक्त झालेआहे. तर येथील 7 रुग्णांना येथून जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. तर सध्या या रुग्णालयात 3 ऑक्सीजन सिलेंडर असून अजून 5 ऑक्सीजन सिलेंडर जिल्हा रुग्णालयातून उपलब्ध होणार असल्याची माहिती श्रीमती रंजनकर यांनी यावेळी दिली.

नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा कडक कारवाई – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरेाना रुग्णांची संख्या हळुहळु नियंत्रणात येत आहे.  परंतु काही दिवसांपासून जिल्ह्यात Break The Chain नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यापुढेही Break The Chain नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.  

Displaying IMG_20210507_135324.jpg

          जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली Break The Chain  च्या अनुषंगाने बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपा अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार,  जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे, तसेच अन्न व औषध प्रशासनाचे श्री काळे,  कृषि अधिकारी श्री गंजेवार आदी उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणा  सक्षमपणे काम करत आहे. शहरातही मनपाचे वार्डनिहाय पथके कार्यरत आहेत तसेच पोलिस आणि महसुल प्रशासन देखील उत्तम काम करत असून नियम मोडणाऱ्यांवर अनेक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. परंतु अनेक ठिकाणी नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसत नसल्याचे सांगुण जिल्हाधिकारी म्हणाले की, अनेक ठिकाणी औषधांच्या दुकानांवर आईसक्रीम, चॉकलेट्स तसचे इतर साहित्य विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले आहे, शहरात नागरिक अनेक ठिकाणी विनामास्क आणि विनाकारण फिरताना निदर्शनास येत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा, प्रादेशिक परिवहन विभागाने पेट्रोल पंपावर पथक तैनात करुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, राज्य उत्पादन विभागाने देखील मद्य विक्रेते नियमांचे पालन करत आहेत का हे गांभीर्यांने पाहावे नसता नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

          पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी मेडिकल होणारी गर्दी लक्षात घेता तिथे शारीरिक अंतर पाळण्याचे नियम कडक करण्याचे निर्देश दिले, जे दुकाने सकाळी 11 नंतर उघडी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

          यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कारवाईं बाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.

          अन्न व औषध विभागचे आयुक्त श्री काळे म्हणाले की, मेडिकलच्या दुकानांवर इतर साहित्यांची विक्री करणाऱ्या मेडिकल चालकांवर कडक कारवाई करण्यात आली असून यापुढेही यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

          राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक श्री कदम यांनी सांगितले की, Break The Chain  अंतर्गत नियमांचे पालन न करणाऱ्या 17 आस्थापणांवर कारवाई केली असून आजपर्यंत 89 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापुढेही नियमांची कडक अमंलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

          प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार आपल्या विभागामार्फंत केलेल्या कारवाई बाबत सांगताना म्हणाले की, कोविडच्या पार्श्वभुमीवर नवीन वाहनांची नोंदणी पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे आणि यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सागितले.