दोघांचा जीव वाचविणाऱ्या पोलिस नाईक मन्मथ धुमाळ यांचा  गौरव 

निलंगा,७मे /प्रतिनिधी  तालुक्यातील कासारशिरसी  येथील पोलिस  ठाण्यात कार्यरत असलेले  पोलिस नाईक  मन्मथ धुमाळ यांचा  नैसर्गिक आपत्तीच्या वेळी उत्तम कामगिरी केल्याबद्दल  पोलिस महासंचालक मुंबई यांनी विशेष सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला  आहे.  .कासार शिरसी  पोलिस ठाण्यात  कर्तव्यदक्ष  पोलिस नाईक म्हणून मन्मथ धुमाळ कार्यरत आहेत. 

गेल्या वर्षी दिनांक 14 आक्टोबर 2020 वार बुधवार रोजी संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडुन अतिवृष्टी झाली. यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर बर्‍याच ठिकाणी रस्त्यावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद झाले होते . त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून  पोलिस प्रशासनाच्या वतीने पुलावरून व रस्त्यावरून पाणी वाहत असल्याच्या ठिकाणी  पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  त्यावेळी कासार शिरसी- बसवकल्याण रोडवरील नेलवाड ओढ्याला पुर आला होता. त्यामुळे पुलावरून व रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात  पाणी असल्याने वाहतूक   बंद झाले होते. त्यावेळी तेथे पोलीस नाईक मन्मथ धुमाळ हे बंदोबस्तावर होते. 

बसवकल्याण येथून सहा आसनी रिक्षाने काही प्रवासी तेथे आले. यातील दोघेजण पाण्यातून पायी वाट काढीत निघाले. त्यांच्या विरुद्ध दिशेला असलेले धुमाळ ओरडून सांगत होते. पाणी जास्त आहे येऊ नका तरी त्यानी पाण्यातून ओढा ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही पाण्यासोबत वाहून जाऊ लागले. यावेळी कर्तव्यावर असणारे  पोलिस नाईक धुमाळ यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता  क्षणाचा ही विलंब न लावता पाण्यात उडी मारून वीस फूट वाहत्या पाण्यात जाऊन दोघांनाही वाचवले.  त्यामुळे दोघांचाही जीव वाचला. 

याची खबर सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली तर उपस्थित एकाने या घटनेचा व्हिडिओ काढुन सोशल मीडियावर व्हायरल केला त्यामुळे हा विषय चर्चेत आला . या धाडसाचे दखल घेऊन  तत्कालीन गृहमंत्री यांनी ट्विट करत  मन्मथ धुमाळ यांचे अभिनंदन केले होते . तर नूतन पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी धुमाळ यांना बोलावून घेऊन सत्कार करत घटनेची माहिती घेतली होती . या सर्व धाडसाची दखल घेत  प्रती वर्षा प्रमाणे विविध  कामे करणाऱ्या कर्तुत्ववान पोलिसांना   पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जातात यात  धुमाळ यांना पोलीस महासंचालक यांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.  हा पुरस्कार मिळाला असल्याने त्याचे पोलीस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे तर सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.