लसीकरणाचा वेग कमी होऊ नये यासाठी राज्यांना जागरूक करण्याची गरज- पंतप्रधान

कोविड-19 महामारी आणि सार्वजनिक आरोग्याचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

आरोग्यविषयक पायाभूत व्यवस्था वाढवण्यासाठी आवश्यक मुद्दयांविषयी राज्यांना मदत आणि मार्गदर्शन केले जावे-पंतप्रधान

नवी दिल्ली ,६ मे  / प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 शी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विविध राज्यांमध्ये तसेच जिल्ह्यांमध्ये वाढलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.ज्या 12 राज्यांमध्ये एक लाख पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण आहेत त्या राज्यांची माहितीही पंतप्रधानांना देण्यात आली. कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा अधिक प्रकोप आहे, याविषयीही त्यांना सांगण्यात आले.

विविध राज्यांनी वैद्यकीय पायाभूत पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. आरोग्यविषयक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी काय काय गोष्टी करता येतील याचे मार्गदर्शन आणि मदत राज्यांना द्यावी अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली.

संसर्ग रोखण्यासाठीच्या जलद आणि सर्वसमावेशक उपाययोजना सुनिश्चित करण्याविषयीच्या आवश्यकतेवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. असे जिल्हे, जिथे रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण 10 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे, तसेच 60 टक्के पेक्षा जास्त रुग्ण, रुग्णालयात ऑक्सिजन युक्त बेड किंवा अतिदक्षता विभागात आहेत, अशा जिल्ह्यांना वेगळे काढून त्यांची यादी तयार करावी, असा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पंतप्रधानांना यावेळी सांगण्यात आली.

तसेच देशात औषधांच्या उपलब्धतेचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. रेमडेसीवीरसह इतर सर्व कोविड संबंधित औषधांचे उत्पादन वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी त्यांना महिती देण्यात आली.

लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला आणि येत्या काही महिन्यात लसींचे उत्पादन वाढवण्यासाठीचा आराखडा देखील यावेळी तयार करण्यात आला. आतापर्यंत सर्व राज्यांना मिळून 17.7 कोटी लसींचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांना देण्यात आली. पंतप्रधानांनी लस वाया जाण्याच्या प्रमाणाचाही राज्यनिहाय आढावा घेतला. 45 वर्षे वयाच्या लोकसंख्येपैकी पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 31% जणांना किमान लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे, अशी महिती त्यांना देण्यात आली.

लसीकरणाचा वेग कमी होता कामा नये, याबद्दल सर्व राज्यांना स्पष्ट सूचना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केलं.टाळेबंदी लागू असली आणि आरोग्य पायाभूत व्यवस्थांवर ताण असला तरीही, नागरिकांना लसीकरण सुविधा दिली जावी, लसीकरण मोहिमेतील आरोग्य कर्मचार्यांना इतरत्र कामांसाठी वळवले जाऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.

राजनाथ सिंह, अमित शाह. निर्मला सीतारामन, डॉ हर्ष वर्धन, पीयूष गोयल, मनसुख मांडवीय यांच्यासह काही मंत्री या बैठकीला उपस्थित होते.