संचारबंदीची खिल्ली;बंदी असताना दुकाने उघडली,दहा दुकाने सिल

उमरगा ,५ मे /प्रतिनिधी :

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावलेले असताना, अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत कापड दुकानासह इतर दुकानात बंद शटरआड सुरू असलेल्या व्यवहाराचा ,बुधवारी  उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी चांगलाच समाचार घेतला .
 दरम्यान उमरगा शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाची जणू लाट सुरू आहे. रूग्ण संख्या आणि मृत्युचे प्रमाण वाढत आहे. अशा स्थितीत प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या काळात दुकानदारांची मक्तेदारी आणि नागरिकांच्या़ बेफिकीरीकडे पोलिस, पालिकेचे दुर्लक्ष होत होते. अखेर बुधवारचा मुहुर्त मोठ्या कारवाईसाठी यशस्वी ठरला.उमरगा शहर व तालुक्यात २०२१ या वर्षात कोरोना संसर्गाचा वेग चौपटीने वाढला आहे. फेब्रुवारी, मार्चनंतर एप्रिल महिन्यात बाधितांची संख्या सतराशेपेक्षा अधिक झाली आहे. प्रशासनाने संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी लागू केली परंतु बऱ्याच दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नव्हते. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला सकाळी सात ते अकरापर्यंत सुरु असताना बाजारपेठेतील कापड व्यापारी, सराफ व्यापारी, जनरल स्टोअर्सचे दुकाने छुप्या पद्धतीने सुरु ठेवण्यात येत होती. बुधवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक तुळशीदास वऱ्हाडे, अभियंता डी.पी. राऊत, करबस शिरगुरे, शेषेराव भोसले, किरण क्षीरसागर, सलीम सास्तुरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने बाजारपेठेत धडक कारवाईला सुरूवात केली. त्यात शामकुमार द्वारकादास कापड दुकान, स्वागत कलेक्शन, लाईफ स्टाईल, गुडलक जनरल स्टोअर्स, सिद्धी इलेक्ट्रीकल्स यासह दहा दुकाने पालिकेने सिल केले असून प्रत्येकी दहा हजार दंड केले.  दुपारपर्यंत चार दुकानदाराकडून प्रत्येकी दहा हजाराचा दंड वसुल झाला होता.

खरे तर पोलिसांनी व नगरपरिषदने कडक अमलबजावणी आज पर्यंत का केले नाही?दुकाने व व्यापारी प्रतिष्ठान अगदी सुरवातीपासून चोरून उघडले जात होती . व्यापारी कायदा धाब्यावर बसवून व्यवहार करीत होते . हे प्रशासनाच्या नजरेस आले नाही हे नवलच म्हणावे लागेल .