राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 या आणखी दोन महिन्यांसाठी अतिरिक्त अन्नधान्य पुरवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली ,५ मे /प्रतिनिधी 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत( तिसरा टप्पा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 या आणखी दोन महिन्यांसाठी अतिरिक्त अन्नधान्य पुरवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली.

Cabinet approves free food grain to beneficiaries for 2 more months

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील निर्णयाला मान्यता देण्यात आली.

i)                प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत( तिसरा टप्पा) आणखी दोन महिन्यांसाठी अतिरिक्त अन्नधान्य पुरवणे म्हणजेच मे आणि जून 2021 या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या(एनएफएसए) थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत( डीबीटी) येत असलेल्या लाभार्थ्यांसह( अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रमाची कुटुंबे) 79.88 कोटी लाभार्थ्यांना माणशी पाच किलो मोफत धान्य

ii)            सध्याच्या एनएफएसएच्या अस्तित्वात असलेल्या प्रमाणाच्या आधारावर गहू/ तांदूळ यांचे राज्ये/ केंद्रशासित प्रदेशनिहाय वितरण याबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग निर्णय घेईल. तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग या योजनेंतर्गत अन्नधान्याच्या साठ्याची उचल/ वितरण याला अंशतः आणि स्थानिक लॉकडाऊन स्थिती आणि मान्सून, चक्रीवादळ यांसारख्या विपरित हवामानविषयक स्थितीमध्ये  पुरवठा साखळी आणि कोविडमुळे घातलेले निर्बंध यांना विचारात घेऊन परिचालनाच्या गरजेनुसार मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेऊ शकेल.

iii)        पुरवण्यात येणारा अन्नधान्याचा एकूण साठा सुमारे 80 लाख मेट्रिक टन असू शकेल.

दोन महिन्यांसाठी टीपीडीएस अर्थात लक्ष्याधारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत 79.88 कोटी लाभार्थ्यांना माणशी पाच किलो धान्य पुरवण्यासाठी 25332.92 कोटी रुपयांच्या अनुदानाची गरज लागणार असून तांदळासाठी रु 36789.2/ मेट्रिक टन आणि गव्हासाठी रु 25731.4/ मेट्रिक टन खर्च अपेक्षित आहे.

कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे गरिबांना भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्यास या अतिरिक्त पुरवठ्यामुळे मदत होईल. कोणत्याही गरीब कुटुंबाला पुढील दोन महिने अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार नाही.