जालना जिल्हा रुग्णालयातून गायब झालेला कोरोनाग्रस्त रुग्ण अपघातात ठार

जालना,५मे / प्रतिनिधी 

जालना ​जिल्हा रुग्णालयातून गायब झालेला कोरोनाग्रस्त रुग्ण अपघातात ठार झाल्याची खळबळजनक घटना जालन्यात घडली आहे .

जालना शहरातील भाग्योदयनगर भागातील एका 48 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर जिल्हा सरकारी कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते.हा रुग्ण अचानक रुग्णालयातून मंगळवारी सकाळी गायब झाला ​होता. ​मोटरसायकलवरून एकटाच औरंगाबादच्या दिशेने  रोडने जात असताना औद्योगिक वसाहतीतील त्रिमूर्ती चौकात त्याच्या  मोटरसायकलला एका पाण्याच्या ​टँकरने ​ जोरात धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला .घटनेची माहिती कळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून ​मृतास ​  जिल्हा रुग्णालयात दाखल केले.याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   
जिल्ह्यातील कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अनेक कोविड रूग्ण दवाखान्याच्या आवारात मोकाट फिरत असतात त्यांचे नातेवाईक त्यांना मैदानावर भेटून जातात​.​ कोणत्याच प्रकारचे नियंत्रण कुठेच नसून पीपीई किट घातलेले डाॅक्टर व इतर आरोग्य कर्मचारीवर्ग रुग्णालयातून बाहेरच्या आवारात फिरत असतात ​.​कोविड रूग्णालय परिसरात रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी गर्दी नेहमीच असते बाहेर गावाहून आलेले रूग्ण संख्येत मोठी वाढ होत असून कोविड रुग्णालयातील शिस्त कोलमडून पडत आहे.अशाच वातावरणात अपघातात ​मृत ​ झालेला हा ​को​रोनाग्रस्त रूग्ण मोटारसायकलवरून औरंगाबादला जात होता दुर्दैवाने त्याचा अपघात झाला.