मनपाच्‍या ४८ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी ,दोघा आरोपींना १० मे पर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद  , ४ मे /प्रतिनिधी 

मनपाच्‍या औषध भंडारातून ४८ रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी केल्याप्रकरणात जिन्‍सी पोलिसांनी मनपाचा औषध निर्माण अधिकारी तथा भंडार प्रमुख विष्‍णु दगडुजी रगडे (५४, रा. मारोतीनगर, मयुर पार्क हर्सुल) आणि सहायक औषध निर्माण अधिकारी प्रणाली शेषराव कोल्‍हे (ज्‍योत्सना हा.सो मयुर पार्क) या दोघांना सोमवारी दि. सायंकाळी अटक केली. दोघा आरोपींना १० मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी मंगळवारी दि.४ दिले.

प्रकरणात मनपाचे वैद्यकिय अधिकारी तथा औषधी भंडार नियंत्रक बाळकृष्‍ण दत्तात्रय राठोडकर (५२, रा. दिशा श्रीपुरम, बीड बायपास रोड) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, १९ एप्रिल रोजी औषध भंडरात १२६२ रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्‍लक होता. २० एप्रिल रोजी सदरील साठा मेल्ट्रॉन हॉस्‍पीटलला पाठविण्‍याचे आदेश राठोडकर यांनी दिले. त्‍यानूसार भंडारप्रमुख विष्‍णु रगडे आणि सहायक औषध निर्माण अधिकारी प्रणाली कोल्‍हे यांनी सदरील साठा मेल्ट्रॉन हॉस्‍पीटलला पाठविला. २३ एप्रिल रोजी मेल्‍ट्रॉन हॉस्‍पीटल येथील भंडार प्रमुख संतोष कापूरे व पुजा कुलकर्णी यांनी सदर बॉक्स तपासले असता त्यात ३१ हजार ९८७ रुपये किंमीतीचे ४८ रेमडीसिवीर इंजेक्शन ऐवजी एमपीएस चे ७५ इंजेक्शन आढळले. त्‍यांनी ही बाब राठोडकर यांना कळवली. त्‍यानूसार ४८ रेमडीसिवीर इंजेक्शन चोरल्याची बाब समोर आली. प्रकरणात जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी तपास करुन दोघा आरोपींना अटक केली. आज आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील भागवत काकडे पाटील यांनी आरोपींनी सदर ४८ इंजेक्शन  कोणालविक्री केले अथवा लपवून ठेवले याचा तपास करुन ते इंजेक्शन हस्‍तगत करणे आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे आहे. आरोपींनी रेमडीसिवीर इंजेक्श्‍ान ऐवजी दिलेली एमपीएस ची इंजेक्शन कोठून आणली याचा तपास करणे आहे. तसेच आरोपींनी मोठी अफरातफर केल्याची दाट शक्यता असून आरोपींचे मोठे रॅकेट असण्‍याची शक्यता नाकरता येत नसल्‍याने आरोपींच्‍या मोबाइलचे सीडीआर तपासणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.