स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने देशातील विद्यापीठांमध्ये स्वतःचे स्थाननिर्माण करावे : २३ व्या पदवीदान समारंभात राज्यपालांनी व्यक्त केली अपेक्षा

Displaying 02.jpg

मुंबई, दि. ४ : गुरु गोविंदसिंह यांच्यावास्तव्याने पुनीत झालेले नांदेड एक प्रेरणादायी तीर्थक्षेत्र आहे. नांदेडला देशात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे तेथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा (स्वरातीम) विद्यापीठाने देखील प्रयत्नपूर्वक देशातील विद्यापीठांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करावे व ऑक्सफर्डप्रमाणे नांदेडला गुणवत्तेचे सर्वोत्तम केंद्र करावे, अशी सूचनावजा अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थमराठवाडा विद्यापीठाचा २३ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (दि. ४) संपन्न झाला. त्यावेळी राजभवन येथून संबोधन करताना राज्यपाल बोलत होते.

दीक्षांत समारोहाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, टाटा मूलभूत विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. रामकृष्णन, स्वरातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन व विद्यापीठाच्या विविध प्राधिकृत मंडळांचे सदस्य व स्नातक उपस्थित होते.

दीक्षांत समारोहास उपस्थित सर्व स्नातक, पीएच.डी. प्राप्त उमेदवार तसेच सुवर्ण पदक विजेत्यांचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, सध्याचे युग आंतरशाखीय अध्ययनाचे आहे. अश्यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी टीम स्पिरिटने तसेच परस्पर सहकार्याने काम केल्यास सफलता निश्चितपणे प्राप्त होईल.

स्नातकांनी पदवी प्राप्त करून अल्पसंतुष्ट न राहता आपले शिक्षण सातत्याने सुरु ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये अनंत क्षमता असून ते समाजाला, देशाला तसेच मानवतेला मोठे योगदान देऊ शकतात याचे कोश्यारी यांनी स्मरण दिले.

समाज आपल्याला नेहमीच देत असतो ; आपण समाजाला अधिकाधिक कसे देऊ शकतो याचा विद्यार्थ्यांनी विचार केल्यास विद्यापीठ देशात आदर्श निर्माण करू शकेल असे त्यांनी सांगितले.

माशेलकर टास्क फोर्सचा अहवाल दोन महिन्यात : उदय सामंत  

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात कसे राबविता येईल याचा अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला टास्क फोर्स येत्या दोन महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

स्वरातीम विद्यापीठाने मलेशियातील शिक्षण संस्थेशी सहकार्य केल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले गेले पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले. स्वरातीम देशातील सर्वोत्तम शैक्षणिक केंद्र व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुंबई येथील टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. डॉ. एस.रामकृष्णन आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, आज जे पदवीधर होत आहेत त्यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. एक असे विद्यापीठ जे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने आहे. आज पदवीधर स्नातक म्हणून मी तुम्हाला स्वामी रामानंद तीर्थ यांना अनुसरण्याचे आहे, त्यांच्या जीवनातून काही मुल्य अंगीकारण्याची विनंती करतो. शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. केवळ पदवी संपादन करण्यासाठी शिक्षण नाही तर विविध प्रकारची जीवन कौशल्य प्राप्त करण्यासाठी देखील आहे. आपल्या सभोवती अनेक प्रश्न आणि आव्हाने आहेत. त्यापैकी एका अथवा काही तुम्ही संधी म्हणून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे समाजाला आणि देशाला सहाय्यभुत ठरेल. शेवटी ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, विद्यार्थ्यांनी छंद जोपासावा. कुटुंब आणि मित्र यांच्याशी वैयक्तिक संबंध ठेवावेत. आयुष्याच्या ध्येय प्राप्तीसाठी नेहमी प्रयत्नशील असावे. यासर्वांचे महत्त्व आपण या साथीच्या रोगात अनुभवलेच असेल.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाच्या उपलब्धी बाबत वैशिष्ट्यपूर्ण आढावा सादर केला. पदवीधारक, सुवर्णपदक पारितोषिक प्राप्त आणि इतर पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी योगदान द्यावे आणि विद्यापीठाला उत्कृष्ठतेच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सहाय्य करावी, अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठ स्थापनेपासून पहिल्यांदाच दीक्षान्त समारंभ दूरदृष्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे आयोजित करण्यात आला होता. यासाठी विद्यापीठाच्या आय.टी. विभागाचे सिस्टीम एक्सपर्ट शिवलिंग पाटील, सुनील जाधव, अजय दर्शनकार, लीना कांबळे आणि संदीप टाकणखार यांनी यशस्वितेसाठी तांत्रिक सहाय्य केले.  

 दीक्षांत समारोहात २२२८५ स्नातकांनापदव्या तर २१५ उमेदवारांना पीएच डी प्रदान करण्यात आल्या.यावेळी उन्हाळी-२०२० परीक्षेत विविध विषयांमध्ये सर्वप्रथम आलेल्या ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक जाहीर केले. याशिवाय ३९० पदविका, १७९१ पदवी, ४५५१ पदव्युत्तर आणि २५१ पीएच.डी.पदवीधारक असे एकूण २२२८३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पीएच.डी. विद्यार्थी, विद्यापीठ परिसर, उप-परिसर, न्यु मॉडेल डिग्री कॉलेजच्या ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, त्यांना लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष पदवी देण्यात येणार आहे. तर तेविसाव्या  दीक्षान्त  समारंभासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी आवेदन पत्र सादर केलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र त्यांच्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पदवी वितरण कार्यक्रमामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत.

 विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत वक्ते,  वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.पंचशील एकंबेकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील आणि कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.