लातूर जिल्ह्यात आयुषच्या डॉक्टरांना घेऊन कोविड केअर सेंटर सुरु करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई,,४ मे /प्रतिनिधी : 

देशभरासह राज्यात कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आज ॲलोपॅथीचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येत आहे. पण येत्या काळात लातूर जिल्ह्यात आयुषच्या सर्व डॉक्टरांना एकत्र करून पहिले कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सांगितले. आयुष टास्कफोर्सचे सदस्य यांच्या समवेत श्री. देशमुख यांनी आज ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.

मंत्री श्री.  देशमुख म्हणाले की,  गेल्या जवळपास वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. यामुळेच कोविड केअर सेंटरमध्ये आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीचा उपयोग रुग्णांसाठी करून एक पायलट सेंटर लातूरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न आहे.  सध्याच्या काळात कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीमार्फत उपचार देता येऊ शकतात. त्यासाठी एस.ओ.पी.तयार करण्याचे काम आयुष संचालनायामार्फत करण्यात यावे. जेणेकरून राज्यात आयुष संचालनायाअंतर्गत येणाऱ्या डॉक्टरांना या एस.ओ. पी.अंतर्गत कोविड रुग्णांवर उपचार करता येऊ शकतील. आयुर्वेद आणि उपचार पद्धतींचा उपयोग कोविड रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो. त्यामुळे ही एस.ओ.पी. वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आयुष संचालक यांनी तयार करावी.

सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईल. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथींना उपचारांसाठी परवानगी द्यावी, असे केंद्र शासनाकडे पत्र आयुष संचालनायामार्फत देण्यात येईल, असेही श्री देशमुख यांनी सांगितले. येणाऱ्या काळात लातूरमध्ये प्रामुख्याने इंटिग्रेटेड आयुष क्लिनिक सुरु करण्याबाबत विचार असून याबाबतच्या अंमलबजावणीसाठी आयुष संचालयानाने पुढाकार घ्यावा.

श्री. देशमुख म्हणाले की, कोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ॲलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्या असू शकतात. आयुष संचालनायांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या  संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिक, औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज आयुष टास्क फोर्स सदस्यांसोबत झूम मीटिंगद्वारे चर्चा केली. आजच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, आयुष संचालक डॉ. कुलदीप राज कोहली, डॉ. झुबैर शेख, डॉ. मनीष पाटील, डॉ. जवाहर शाह, डॉ. शुभा राऊळ, डॉ. उर्मिला पिटकर, डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. मनोज राजा, डॉ. जसवंत पाटील, डॉ. राजश्री कटके, डॉ. संजय लोंढे, डॉ. अमित दवे, डॉ. राजेंद्र निरगुडे, डॉ. नवीन पावस्कर, डॉ. पुरुषोत्तम लोहिया, डॉ. हरीश बी सिंग, जयंत वकनाली आदी उपस्थित होते.