उमरगा रुग्णालयात सुविधा वाढणार,जादा व्हेंटिलेटर,ऑक्सिजन सिलेंडर मिळणार 

उमरगा ,४ मे /प्रतिनिधी 

उमरगा -लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णवाढ ,कोरोनाने होणारे मृत्यू यावर ,तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची तातडीने भेट घेतली . यावेळी येथील उपजिल्हा कोविड रुग्णालयात चार व्हेंटिलेटर तातडीने द्यावे,ऑक्सिजन सिलेंडर वाढवून देणे,उमरगा ,लोहारा व मुरूम येथे ॲंब्युलन्स  द्यावेत व विजय क्लिनिक येथे डीसीएच साठी   ४८ बेडची मान्यता द्यावी अशी मागणी केली . 
सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून तातडीने उपलब्ध करण्यात येईल असे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले .यावेळी बाजारसमितीचे सभापती सुलतान सेठ,अधिकारी वर्ग उपस्थित होते . 
तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व होणारे म्रूत्यु रोखण्यासाठी सोमवारी आमदार चौगुले यांनी तातडीने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांची भेट घेतली .यावेळी आमदार चौगुले यांनी उपाययोजना बद्दल बोलताना अनेक बाबींवर चर्चा केली . यात प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालयात चार व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत. शहरात अनेक खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहेत . त्यांना व उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत असल्याने ,एकूण १२० सिलेंडर वाढवून मिळावेत ,३ रुग्णवाहिका तातडीने द्यावेत . ऱेमडिसिविर इंजेक्शनचा पुरवठा मुबलक व निरंतर व्हावा ,आदी बाबींवर चर्चा झाली.जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी उपरोक्त सर्व मागण्या मान्य करीत दोन दिवसात सर्व मागण्यांची  पूर्तता त्वरित केली जाईल असे सांगितले . यापूर्वी आमदार चौगुले यांनी तामलवाडी येथील ऑक्सिजन प्लांटला भेट दिली.यावेळी वाढीव सिलेंडरचा कोटा  तात्काळ वितरीत करावा अशी सूचना यावेळी त्यांनी  केली.