अनुसूचित जातीच्या बांधवांवरील अन्याय, अत्याचार अजिबात सहन केले जाणार नाहीत,दोषींविरुद्ध कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि. १० : राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार कोणत्याही परिस्थितीत अजिबात सहन केले जाणार नाहीत, महाराष्ट्र शासन या बांधवांच्या पाठीशी असून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील  दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब, अनुसूचित जाती व नवबौद्ध बांधवांवर अन्याय अत्याचार होता कामा नये. राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांनी सांगितले.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी पोलीस ठाण्यातंर्गत दोन-तीन दिवसांपूर्वी एका मुलाला मारहाण झाली, त्यात तो मयत झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे.तसेच नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथील अरविंद बनसोड या तरूणाच्या मृत्यूची चौकशी देखील पारदर्शी व निःपक्षपातीपणे करण्यात येईल. त्यासंबंधातील निर्देशही गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याकडे  दिला असल्याचे असल्याचेही गृहमंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *