रेमडेसिवीर खरेदीचा वाद :खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेप फेटाळले

दिल्ली नव्हे…. चंदिगड येथून १७००  रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा खरेदी
प्रकरणाची सुनावणी ५ मे रोजी होणार

औरंगाबाद ,३ मे /प्रतिनिधी ​ 

अहमदनगर मतदारसंघाचे भाजपाचे खासदार सुजय विखे  रेमडेसिविर खरेदी प्रकरणात १०हजार इंजेक्शन आणल्याचा आक्षेप फेटाळताना केवळ १७०० इंजेक्शनचा साठा खरेदी केल्याचे त्यांचे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी औरंगाबाद खंडपीठात सांगितले. 

अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला.  या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिविरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. सदर साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाला व राहता येथील सरकारी दवाखान्याला देखील देखील वाटप केले. १०,००० ​ रेमडेसिवीर ​इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ सुजय विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी  केली असावी,  सदर ​ रेमडेसिवीर ​ इंजेक्शन चा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा ​ रेमडेसिवीर ​ इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब देखील कुठे नाही अश्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ​औरंगाबाद खंडपीठात ​  सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात खासदार डॉ सुजय विखे यांचावर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.

आज रोजी,  याचिकाकर्ते यांनी ​या याचिकेत ​ दुरुस्ती अर्ज दाखल करून एका वृत्तपत्रात आलेले बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी राजकीय लोकांनी जसे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, ​खासदार ​शरद पवार व ​आमदार ​रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांनी कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याबद्दल कार्यवाही करावी अशी विनंती सदर अर्जात केली आहे व त्याची सुनावणी देखील 5 मे रोजी होणार आहे. 

डॉ सुजय विखे यांनी सदर याचिकेत त्यांना प्रतिवादी बनवावं व त्यांचे म्हणणे ऐकावे अशी विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. त्यांनी १७००  ​ रेमडेसिवीर ​ इंजेक्शनचा साठा नियमाप्रमाणे खरेदी केला व त्यातले १२०० ​ रेमडेसिवीर ​ इंजेक्शन चा साठा चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणला. सदर  रेमडेसिवीर ​ इंजेक्शन चा साठाची गोपनीयता पाळण्यासाठी शासकीय अधिकारी खोटे कागदपत्रे  तयार करत आहेत. एकाबाजूने शासकीय यंत्रणा व डॉ विखे चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणलेले ​ रेमडेसिवीर ​इंजेक्शनचा साठा एकाच कंपनीचा असल्याचे भासवत आहे परंतु दुसऱ्याबाजूने  त्यांच्या मार्फत ३ वेगळ्या कंपनीचे ​ रेमडेसिवीर ​ इंजेक्शनचा साठा वितरित करण्यात येत असल्याने त्यांच्याकडे १७०० ​ रेमडेसिवीर ​इंजेक्शनचा साठा व्यतिरिक्त अजून साठा असल्याचे मत याचिकाकर्त्यांच्या वतीने त्यांचे ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी मांडले. 

विखे पाटील यांनी  केलेल्या अर्जावर विचार करणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
“आपल्या ग्राहकाला (विखे पाटील) आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्याने विमान आणि विमानतळावर स्वतःची नोंद ठेवणे आणि मतदारसंघातील लोकांसाठी औषध मिळवण्यासाठी आपल्या संपर्कांचा वापर केल्याचा दावा करत व्हिडिओ अपलोड करणे आवश्यकता नव्हती . त्यांनी  असे करायला नको होते असे न्यायमूर्ती घुगे म्हणाले.

त्यानंतर गुप्ते म्हणाले की, खासदार हे  तरुण आहेत  आणि म्हणूनच त्यांनी  हे केले असावे परंतु यामुळे ते  आरोपी होत नाहीत.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी त्यांच्या आज दाखल केलेल्या शपथपत्रात असे सांगितले आहे कि सदर ​ रेमडेसिवीर ​ इंजेक्शनचा साठा चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणण्याबाबत त्यांना त्याची काही एक कल्पना नव्हती. त्यांनी फक्त १७०० इंजेक्शनचा साठा खरेदी करण्यासाठी परवानगी डॉ सुजय विखे व त्यांच्या हॉस्पिटलला दिली होती व सदर १७०० इंजेक्शनचा साठ्याची नोंद जिल्हा शल्यचिकित्सक, अहमदनगर यांच्याकडे आहे असे सांगण्यात आले आहे.     

प्रधान सचिव, गृह विभाग, मुंबई व पो​लि​स अधीक्षक, अहमदनगर यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ​ रेमडेसिवीर ​ इंजेक्शनच्या खोक्याबद्दलचे अहवाल न्यायालयात सादर केला.  दरम्यान उच्च न्यायालयाचे न्या. आर. व्ही घुगे व न्या. बी यु देबडवार यांनी  सर्व बाबी लक्षात घेता सदर प्रकरणाची सुनावणी ५ मे रोजी ठेवण्यात आली आहे.  
सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने प्रज्ञा तळेकर, अजिंक्य काळे, उमाकांत आवटे व  राजेश मेवारा  काम पाहात आहे तर शासनाच्या वतीने  डी आर काळे  काम पाहत आहे.