गंगापूर उपजिल्हा रूग्णालयासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून देणार-आ.सतीश चव्हाण

औरंगाबाद,२ मे /प्रतिनिधी: – ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.2) गंगापूर येथील उपजिल्हा रूग्णालयास भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

Displaying photo 2.jpg

          गंगापूर उपजिल्हा रूग्णालयात असलेल्या डेडीकेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये जावून आ.सतीश चव्हाण यांनी कोविड बाधित रूग्णांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच याठिकाणी असलेल्या ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची आ.सतीश चव्हाण यांनी स्वत: पाहणी करून याठिकाणी कोण-कोणती वैद्यकीय यंत्रसासामुग्री व साहित्य उपलब्ध आहे, कोणती वैद्यकीय यंत्रसासामुग्री व साहित्याची कमतरता आहे, मनुष्यबळ किती आहे, सध्या ऍक्टीव रूग्णांची संख्या किती, तालुक्यात राबविण्यात आलेली लसीकरण मोहिम आदींचा आढावा घेतला. याठिकाणी दोन व्हेंटिलेटर असले तरी एकच व्हेंटिलेटर कार्यरत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे, तसेच रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याचे येथील डॉक्टरांनी आ.सतीश चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले. रूग्णवाहिके अभावी कुणालाही प्राण गमवावा लागू नये यासाठी मी माझ्या आमदार निधीतून तात्काळ याठिकाणी एक रूग्णवाहिका उपलब्ध करून देत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी लागलीच जाहीर केले.

          याप्रसंगी राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, औरंगाबादचे अध्यक्ष संतोष माने, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, माजी उपनगराध्यक्ष खालेद नाहदी, प्रशांत माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अहमद पटेल, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, अविनाश पाटील, सुरेश नेमाडे, वाल्मिक शिरसाठ, मनोज पाटील वरकड आदींची उपस्थिती होती.

लासूर येथे आ.प्रशांत बंब यांनी उभारलेल्या कोविड रूग्णालयास आ.सतीश चव्हाण यांनी आज भेट देऊन कोविड बाधित रूग्णांशी संवाद साधला. कोविड बाधितांसाठी सर्व सोयी-सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून या भागातील रूग्णांना याचा निश्चितच लाभ होईल असे आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.