राज्यात २६ जिल्ह्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास प्रारंभ

BMC is vaccinating 1,000 people at five centres in Mumbai from 1 pm on Saturday (HT PHOTO/Bhushan Koyande)

मुंबई, दि.१: राज्यात आज दि. १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्ह्यांमध्ये  सुरुवात झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या दि. २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.

लातूर जिल्हयात 18-44 वर्षे वयोगटातील नागरीकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात
Image

लातूर:-राज्य शासनाच्या वतीने कोविड १९ प्रादुर्भावाच्या  पार्श्वभूमीवर  राज्यभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांसाठी मोफत कोविड १९ लसीकरण मोहिमेची सुरुवात  करण्यात आली आहे. लातूर मध्ये या मोहिमेचा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय आयुर्विज्ञान संस्था लातूर या ठिकाणी करण्यात आला.      

यावेळी  जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, दीपक सूळ, मनपा उप आयुक्त मयुरा शिंदेकर , डॉ.संतोष डोपे,ऍड. किरण  जाधव, इम्रान सय्यद, युनूस मोमीन यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.     

Image

जिल्ह्यातील  18 ते 44 वर्षे वयोगटातील सर्व लाभार्थ्यांनी covid-19 चा प्रतिबंध करणारे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी केले. तसेच जिल्ह्यातील एक ही लाभार्थी covid-19 च्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घेऊन लसीकरण मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी असेही निर्देश त्यांनी दिले.   

शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार लातूर जिल्हयात दिनांक 01 मे 2021 पासुन 18 ते 44 वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-19 लसीकरण जिल्‍हयात पाच शासकिय कोविड-19 लसीकरण केंद्रावर मोफत करण्यात येणार आहे. सदरील लसीकरण हे 1) विलासराव देशमुख शासकिय वैद्यकीय महाविद्यालय ,लातूर 2) सामान्य रुग्णालय, उदगीर, 3) उपजिल्हा रुग्णालय, निलंगा 4) ग्रामीण रुग्णालय, औसा, 5) ग्रामीण रुग्णालय, अहमदपुर या केंद्रावर सुरु झाले आहे.   

18 ते 44 वर्षे  वयोगटातील लाभार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने पुर्व नोंदणी करणे, योग्य केंद्र व दिवसाचे ऑनलाईन अपाईटमेंट घेणे आवश्यक आहे. स्पॉट रजिस्ट्रेशन  होणार नाही.  याची  सर्व  नागरीकांनी नोंद घ्यावी. लातूर जिल्हयातील 18-44 वयोगटातील सर्व  लाभार्थ्यांनी कोविड-19 लसीकरण करुन घ्यावे असे अवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी  केले आहे.