तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी 2.45 कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांची कोविन (Co-WIN) पोर्टलवर नोंदणी पूर्ण

भारतातील एकूण लसीकरणाची संख्या 15.22 कोटींहून अधिक

देशभरात 3,86,452 नवे कोरोनारुग्ण,महाराष्ट्रात  सर्वाधिक 66,159 रुग्ण

  • गेल्या 24 तासांत देशभरात 19 लाख कोविड चाचण्या
  • एका दिवसातील सर्वाधिक चाचण्यांचा विक्रम
  • गेल्या 24 तासांत तीन लाखांपेक्षा अधिक कोविड रुग्ण बरे

नवी दिल्ली ,३० एप्रिल /प्रतिनिधी 

देशाची लसीकरणाबाबत उल्लेखनीय प्रगती म्हणजे, लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत 2.45 कोटींहून  अधिक नागरिकांनी कोविन (Co-WIN) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. 28 एप्रिल 2021 पासून ही नोंदणी सुरु झाली असून पहिल्या दिवशी 1.37  कोटी लोकांनी तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 29 एप्रिलला 1.04 कोटींपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली होती.तर, दुसरीकडे, भारतात आतापर्यंत 15.22 कोटींहून अधिक  नागरिकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत, आज सकाळच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एकूण 22,43,097 सत्रांमधून 15,22,45,179 लसींच्या मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. यात, 93,86,904 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि  61,91,118 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी  मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,24,19,965 जणांना पहिली मात्रा, तर 67,07,862 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील  5,17,78,842 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 34,17,911 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5,19,01,218 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,04,41,359 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

देशातील दहा राज्यांत एकूण 67.08% लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 21 लाखांहून  अधिक लोकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या.आज लसीकरण मोहिमेच्या 104 व्या  दिवशी 21,810  सत्रांतून  29 एप्रिल रोजी  एकूण 22,24,548  लसींच्या पहिली मात्रा देण्यात आली. तर, 9,49,745 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.तसेच, गेल्या 24 तासांत, 19 लाखांहून  अधिक (19,20,107) कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आजवर एका दिवसातल्या या सर्वाधिक चाचण्या आहेत.

आतापर्यंत भारतात एकूण 1,53,84,418  कोविड रुग्ण पूर्ण बरे झालेले आहेत. राष्ट्रोय पातळीवरील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 81.99 टक्के इतका आहे.गेल्या 24 तासांत देशभरात 2,97,540  रुग्ण बरे झाले.दहा राज्यात मिळून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  76.61% इतके आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 3,86,452 नवे कोरोनारुग्ण .दहा राज्ये—महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली , कर्नाटक, केरळ ,छत्तिसगढ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मिळून एकूण नव्या रूग्णांपैकी 73.05% रुग्ण आहेत.महाराष्ट्रात  सर्वाधिक 66,159 रुग्ण आढळले आहेत. त्या खालोखाल, केरळमध्ये 38,607 तर उत्तरप्रदेशात 35,104 नवे रुग्ण आढळले आहेत.

सध्या भारतात 31,70,228 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील   एकूण पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 16.90% इतके आहे. गेल्या 24 तासात त्यात  85,414 नव्या रुग्णांची भर पडली. एकूण सक्रीय रूग्णांपैकी 78.18%  रुग्ण  अकरा राज्यांत आहेत. राष्ट्रीय मृत्यूचे प्रमाण  सध्या 1.11% इतके आहे.

गेल्या 24 तासात देशभरात कोविडमुळे 3,498 जणांचा मृत्यू झाला.एकूण मृत्यूंपैकी 77.44%  मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (771) मृत्यू झाले तर त्या खालोखाल दिल्लीत  395 जणांचा मृत्यू झाला.

चार राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात  गेल्या 24 तासात एकाही कोविड मृत्यूची नोंद नाही ही राज्ये म्हणजे, दीवदमण –दादरा नगरहवेली, नागालैंड, त्रिपुरा आणि अंदमान निकोबार बेटे आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय मानसोपचार आणि मज्ज्जाविज्ञान संस्थेतर्फे कोविडशी संबंधित मानसिक आजार आणि मनोबल कायम ठेवण्यासाठी मार्गदर्शन विषयक हेल्पलाइन 080-4611 0007 या क्रमांकावर चालवली जात आहे.