एसबीओए शाळेत उभारले जाणार तात्पुरते कारागृह

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची एसबीओए शाळेस भेट
नूतनीकरणासाठी आलेला खर्च देण्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांचे हर्सूल कारागृह प्रशासनाला आदेश

औरंगाबाद​,२९एप्रिल /प्रतिनिधी :​

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आलेल्या कैद्यांमुळे  जेल मधील इतर कैदी अथवा कर्मचारी यांना कोरोनाची लागन होऊ नये म्हणून तात्पुरते कारागृह उभारणीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी SBOA शाळेस भेट दिली. 

यावेळी तेथील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांशी संवाद साधून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. मागील वेळी देखील तात्पुरते कारागृह उभारल्यानंतर नूतनीकरणासाठी आलेला खर्च जिल्हाधिकारी यांनी त्यांना देण्याचे आदेश दिले.सदरील परिसरात cctv बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तसेच शाळेचे कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा माने यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आभार मानले.हर्सूल कारागृहामध्ये सध्या १४०० च्या जवळपास कैदी तर २१५  कर्मचारी आहेत. एसबीओए शाळेतील ४ रूम ह्या पुरुष कैद्यांसाठी तर १ रूम ही महिला कैद्यांसाठी देण्यात येणार आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. रोडगे, श्री.आर. आर भोसले (प्र. अधिक्षक), श्री.गिरी (पोलीस निरीक्षक),नायाब तहसीलदार श्री.सलोक व संबंधित अधिकरी उपस्थित होते.

हर्सूल कारागृहास भेट

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी आज  हर्सूल कारागृहास भेट देऊन पहाणी केली. यावेळी तेथील रुग्णांची जेवण्याची, राहण्याची व्यवस्था, आरोपीना मिळणाऱ्या सुविधा इत्यादीची बाबींची पहाणी करत त्यांनी तेथील कैद्यांशी संवाद साधला.     तेथील डॉक्टरांनी एका फार्मसिस्टची गरज असल्याचे सांगताच कंत्राटी पद्धतीने फार्मसिस्टची नियुक्ती  करण्याच्या  सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.तसेच किचन मध्ये एक्झॉस्टेड फॅन व जेलमधील अंतर्गत रस्त्यांसाठी तेथिल कर्मचाऱ्यांनी विनंती केली असता जिल्हाधिकारी यांनी संबंधित कामांना मंजुरी दिली. तेथील एकाही कैद्याने तेथे मिळणाऱ्या सुविधेवर प्रश्न निर्माण केले नाही यावर  समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांच्या कार्याचे कौतुक केले.